रेल्वे मार्गावर घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे चांगलेच हाल
रस्त्यावरील प्रवाशांची कोंडी, मुंबईकरांचे हाल!

मुंबई : गणरायाच्या आगमनाची आतुरता सर्वत्र दिसत असताना रविवारी शहरातील बाजारपेठा खरेदीसाठी फुलून गेल्या. गणेशोत्सवासाठी सजावटीपासून मिठाईपर्यंत वस्तू घेण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते. मात्र, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गांवर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची मात्र चांगलेच हाल झाले आहे.
सकाळपासूनच दादर, सीएसएमटी, ठाणे, कुर्ला या बाजारपेठांत गर्दी उसळली होती. खरेदीसाठी निघालेल्या नागरिकांना रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागले.माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यत ब्लॉक घेण्यात आला होता.
हेही वाचा : कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्तांची प्रेरणा; शिवशंभो प्रतिष्ठानला “मोरया पुरस्कार” द्वितीय क्रमांकाने सन्मान
या दरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावरुन वळविण्यात आली होती. त्यामुळे ब्लॉक दरम्यान लोकलची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. यामुळे प्रवाशांना लोकल गाड्यांची प्रतीक्षा करावी लागली. याच वेळी ठाणे ते वाशी-नेरुळ-पनवेलदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर लोकलसेवा बंद होती. त्यामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेले अनेक जण रस्ते मार्गाने प्रवास करू लागले. त्यातच रविवार वेळापत्रकामुळे लोकलची संख्या कमी असल्याने प्रवाशांना लोकलकरिता बराच वेळ वाट पहावी लागत होती. ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी दिसून आलेली.
… रस्त्यावरील प्रवाशांची कोंडी
रविवारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका असल्याने रस्त्यांवरही वाहतूक कोंडी झाली. परिणामी प्रवासासाठी निघालेल्या नागरिकांचे वाहतूक कोंडीत अडकून पडले होते. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे संताप व्यक्त करत पुढील रविवारी, ३१ ऑगस्टला कोणताही मेगाब्लॉक न घेण्याची मागणी केली आहे. गणेशोत्सवात भाविक मोठ्या संख्येने बाहेर पडतात. त्यामुळे रविवार वेळापत्रकाऐवजी नियमित लोकल सेवा सुरू ठेवावी, असेही अनेक प्रवाशांची मागणी आहे.