पुण्यासह सहा जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी ‘अग्निवीर’ भरती मेळावा आयोजित ; अशी करा नोंदणी
![Organized 'Agniveer' recruitment meet for candidates from six districts including Pune; Register to do so](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Organized-Agniveer-recruitment-meet-for-candidates-from-six-districts-including-Pune-Register-to-do-so.jpg)
पुणेः महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (जि. नगर) येथे २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२२ दरम्यान पुण्यासह सहा जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी ‘अग्निवीर’ भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर क्लार्क, स्टोअरकीपर आणि अग्निवीर ट्रेड्समन या पदांसाठी ही भरती होणार आहे.
पुणे, नगर, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि सोलापूर या जिल्ह्यांतील उमेदवार या भरती मेळाव्यात भाग घेऊ शकतील. त्यासाठी https://joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. याच वेबसाइटवर भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती उपलब्ध आहे. या भरती मेळाव्यासाठी ऑनलाइन नोंदणी ३० जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. भरती प्रकियेसंदर्भातील अधिक माहिती https://joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर उपलब्ध असून, विद्यार्थ्यांना अर्ज कसा करायचा आणि भरती प्रक्रिया कशी होईल, परीक्षा कशा असतील याबाबत सर्व माहिती मिळू शकणार आहे, अशी माहिती भरती कार्यालय, मुख्यालय रिक्रुटिंग झोन, पुणेचे संचालक मेजर येसू राजू के यांनी दिली आहे.
अग्निपथ योजनेंतर्गत तरुणांना ‘अग्निवीर’ म्हणून लष्करात भरती करण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. या योजनेला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. मात्र, आता प्रथमच पुणे जिल्ह्यासह इतर पाच जिल्ह्यांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेंतर्गत १७ ते २३ वयोगटातील तरुणांना चार वर्षांसाठी लष्करात काम करण्याची संधी मिळणार आहे. चार वर्षांनंतर त्यांना निर्वाहभत्ताही दिला जाणार असून, भरती होणाऱ्या अग्निवीरांपैकी २५ टक्के अग्निवीरांना लष्करातच आणखी काही वर्षे काम करण्याची संधी दिली जाणार आहे.