लायकी नसलेल्यांच्या हाती देश उभारणीचे काम; अभिनेता सुबोध भावेची जोरदार टीका
![Nation-building in the hands of the unworthy; Strong criticism of actor Subodh Bhave](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/1659418295_लायकी-नसलेल्यांच्या-हाती-देश-उभारणीचे-काम-अभिनेता-सुबोध-भावेची-जोरदार.jpg)
पुणेः ‘आपण सर्व चांगले शिक्षण घेऊन सतत करिअरच्या मागे धावत आहोत. मला चांगली नोकरी कशी मिळेल, परदेशी जाऊन स्थायिक कसे होता येईल, याचाच विचार आपण करत आहोत. ज्या राजकारण्यांची लायकी नाही, अशांच्या हातात आपण देश उभारणीचे काम दिले आहे,’ अशी खंत व्यक्त करत प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी रविवारी राजकारण्यांवर टीकास्त्र सोडले. देश निर्माण करायचे असेल, तर पुढील पिढीमध्ये राष्ट्रीय शिक्षणाचा पाया रुजवावा लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘डीईएस प्री-प्रायमरी स्कूल’तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘शतसूर्याचे तेज’ या लोकमान्यांच्या जीवनकार्याचा वेध घेणाऱ्या नृत्य-नाटिकेचे आयोजन करण्यात आले होते. भावे यांच्या उपस्थितीत ही नाटिका सादर झाली, त्या वेळी ते बोलत होते. ‘डीईएस’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह धनंजय कुलकर्णी, मुख्याध्यापिका माधुरी बर्वे, प्रकाश पारखी, डॉ. राहुल देशपांडे आदी या वेळी उपस्थित होते. या नाटिकेमध्ये २५० विद्यार्धी सहभागी झाले होते.
‘राजकारण्यांच्या हातात देश देऊन काहीही होणार नाही. ते काय करतात, हे आपल्या समोर आहेच. म्हणूनच पुढच्या पिढीमध्ये राष्ट्रीय शिक्षणाची बीजे रोवून त्यांना देशासाठी उभे करणे गरजेचे आहे. इंग्रजांनी नोकरदार तयार व्हावेत, यासाठी आपल्या देशात शिक्षण व्यवस्था आणली. आजही आपण तीच व्यवस्था पाळत आहोत. म्हणूनच ‘मुंबई, महाराष्ट्रातून काही लोक निघून गेले, तर पैसेच राहणार नाहीत’, अशी वक्तव्ये करण्यास काही राजकारणी धजावतात,’ असे सांगत भावे यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. मुख्याध्यापिका बर्वे यांनी स्वागत, प्रास्तविक केले. सोनाली साठे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
हल्ली आपण मुलांना हिंदी, मराठी गाण्यांवर नाचायला सांगतो. एखाद्या चित्रपटातील संवाद सादर करायला सांगतो. पुष्पा चित्रपटातील संवादांच्या सादरीकरणाचे खूळ आले आहे. ते करून देश घडणार नाही. याऐवजी जर मुलांना राष्ट्रपुरुषांचे विचार सादर करायला सांगितले, तर त्यांच्यामध्ये देशाबद्दल आत्मीयता निर्माण होईल.
– सुबोध भावे, प्रसिद्ध अभिनेता.