३८ वर्षीय युवकाची हत्या, गडचिरोलीत नक्षलवाद्यांची दहशत, परिसरात दहशतीचे वातावरण
![Murder of 38 year old youth, terror of Naxals in Gadchiroli, atmosphere of terror in the area](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/Murder-of-38-year-old-youth-terror-of-Naxals-in-Gadchiroli-atmosphere-of-terror-in-the-area.png)
गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील मलमपडूर येथे बुधुवार २२ जून रोजी रात्रीच्या सुमारास नक्षल्यांकडून एकाची हत्या करण्यात आल्याची घटना आज २३ जून रोजी पहाटेला उघडकीस आली. लच्चूराम ओक्सा (वय ३८ रा.भुसेवाडा ता.भामरागड) असे मृतक युवकाचे नाव आहे. हत्येचं नेमकं कारण कळू शकले नाही. मात्र, या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लच्चूराम ओक्सा हा मूळचा भुसेवाडा येथील रहिवासी असून तो मागील बरेच वर्ष गडचिरोली येथे होता. त्याचा काही दिवसांपूर्वी अपघात झाल्याने त्याला अपंगत्व आले. त्यामुळे तो गावाकडे परतला होता. मिळेल तिथे काम करणे आणि आपली भूक भागविणे असचं त्याचा दिनक्रम सुरू होता. दरम्यान, तेंदूपत्ता संकलनाचे काम झाले. तो मलमपडूर येथे फळीवर कामाला असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी २२ जून रोजी मलमपडूर गावातून नक्षल्यांनी त्याला गावाबाहेर घेऊन जाऊन हत्या केली. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन होणार आहे.
सध्या गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा पोलीस शिपाईपदाच्या १३६ रिक्त जागांसाठी पोलीस भरती घेण्यात येत आहे. या पदासाठी जिल्ह्यातील १७ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून रविवार १९ जून रोजी १६ परीक्षा केंद्रावर या उमेदवारांनी लेखी परीक्षा सुद्धा दिली आहे. अगोदर पोलीस भरतीसाठी जिल्ह्यातील युवकांचा फारसा सहभाग नव्हता. पोलीस भरतीला गेल्याची माहिती मिळाली की, नक्षली त्यांची हत्या करायचे. त्यामुळे ग्रामीण भागात एका प्रकारची दहशत होती.
मात्र, गडचिरोली पोलीस दलातर्फे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत असल्याने ग्रामीण भागात याचा खूप मोठा फायदा होताना दिसत आहे. नक्षल्यांची दहशत मिटविण्यासाठी पोलिसांनी ग्रामीण भागात त्यांचे संपर्क मोडून काढले आहे. अनेक स्थानिक नक्षलींना कंठस्नानही घातले. अशात आपले अस्तित्व आणि आपली दहशत कायम असल्याचे दाखविण्यासाठी नक्षल्यांनी ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.