TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ख्याती असलेले खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळाप्रकरणात ईडीकडून रविवारी मध्यरात्री अटक

मुंबई: शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ख्याती असलेले खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळाप्रकरणात ईडीकडून रविवारी मध्यरात्री अटक करण्यात आली. त्यामुळे राऊतांच्या सकाळच्या दैनंदिन पत्रकारपरिषदांमध्ये खंड पडेल, असे वाटत होते. परंतु, ईडीने संजय राऊत  यांना अटक केल्यानंतर आता त्यांची जागा दुसऱ्या राऊतांनी म्हणजे सुनील राऊत  यांनी घेत सकाळची पत्रकारपरिषद घेण्याचा दिनक्रम सुरुच ठेवला आहे. सुनील राऊत हे संजय राऊत यांचे बंधू असून ते भांडूपमधील आमदार आहेत. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर सुनील राऊत यांना तात्काळ त्याजागी उभे राहत मोर्चा सांभाळला आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून ते एकनाथ शिंदे यांच्या बंडापर्यंत प्रत्येकवेळी संजय राऊत हे सकाळी पत्रकारपरिषद घेऊन शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडत होते. काही मोजके अपवाद सोडले तर संजय राऊत यांच्या या दैनंदिन पत्रकापरिषदांच्या कार्यक्रमात कोणताही खंड पडला नव्हता. मात्र, आता ईडीने त्यांना अटक करून त्यांची रवानगी तुरुंगात करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे साहजिकच संजय राऊत यांच्या सकाळच्या पत्रकारपरिषदा बंद होतील,असे वाटले होते. मात्र, आता संजय राऊत यांचे बंधू ही जबाबदारी किमान पहिल्या दिवशी तरी समर्थपणे हाताळताना दिसत आहेत.

संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर कालपासून सुनील राऊत हे सातत्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आहेत. सोमवारी सकाळीही सुनील राऊत यांनी पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप आणि ईडीवर अनेक आरोप केले. संजय राऊत यांना बोगस केसमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात खोटे पुरावे जमा केले जात आहेत. शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. उद्धव ठाकरे यांना एकटं पाडायचं आणि शिवसेना संपवण्याचा हे प्लॅनिंग आहे. भाजपकडून सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे, असा आरोप सुनील राऊत यांनी केला.

‘तुमचा भोंगाही लवकरच बंद होईल’; एकनाथ शिंदेंच्या टीकेला सुनील राऊतांचं प्रत्युत्तर
संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोचक टिप्पणी केली होती. आता सकाळचा ८ वाजताचा भोंगा बंद झाला, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. या टीकेला सुनील राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. शिवसेनेचा भोंगा बंद होणार नाही. संजय राऊत यांना अटक केलीत तरी आम्ही लढत राहू. एकनाथ शिंदे तुमचाही भोंगा काही दिवसांनी बंद होईल, असे सुनील राऊत यांनी म्हटले.

संजय राऊतांना ईडी कोर्टात हजर करणार
ईडीने रविवारी मध्यरात्री संजय राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर आज सकाळी ११ वाजता संजय राऊत यांना ईडी न्यायालयात हजर केले जाईल. यापूर्वी संजय राऊत यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यासाठी राऊत यांना जे.जे. रुग्णालयात नेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जे.जे. रुग्णालयाच्या परिसरातील पोलीस बंदोबस्त सध्या वाढवण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button