![Modi, family, wealth, discord, Mother, without, against, beating, complaint,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/modi-780x470.jpg)
नवी दिल्ली : ललित मोदी हे नाव भारतासह जगभरातल्या क्रिकेट विश्वाला परिचयाचं झालं आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामात ललित मोदी चर्चेचा विषय ठरले होते. आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचेही आरोप झाले. त्यातून वाचण्यासाठी त्यांनी विदेशात पलायन केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ललित मोदी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या कुटुंबात संपत्तीवरून कलह निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. खुद्द ललित मोदींनीच केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये यासंदर्भात पुष्टी करण्यात आली आहे. मोदी कुटुंबातील तब्बल ११ हजार कोटींच्या संपत्तीबाबत हा वाद असल्याचं सांगितलं जात आहे.
नेमकं काय घडलं?
ललित मोदी यांचे बंधू आणि गॉडफ्रे फिलीपचे संचालक समीर मोदी यांना मारहाण झाल्याची बाब दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यानंतर खुद्द समीर मोदी यांनीच त्यांच्या आई बिना मोदी यांच्यावर मारहाण करण्यासाठी गुंड पाठवल्याचा आरोप केला. त्यानंतर ललित मोदी यांनी भावाच्या दाव्यांना समर्थन देत आई बिना मोदींचाच या मारहाणीमागे हात असल्याचा दावा केला आहे. तसेच, त्यांनी समीर मोदी यांचे रुग्णालयात प्लॅस्टर लावलेले फोटोही शेअर केले आहेत. बिना मोदी यांनी त्यांच्या सुरक्षारक्षकांकरवी आपल्या भावाला मारहाण केल्याचं ललित मोदींनी म्हटलं आहे.
काय आहे ललित मोदींच्या पोस्टमध्ये?
ललित मोदी यांनी शनिवारी संध्याकाळी यासंदर्भातली एक पोस्ट त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी समीर मोदी रुग्णालयात पोस्टर लावलेल्या अवस्थेत असल्याचे फोटोही शेअर केले आहेत. तसेच, समीर मोदी यांना मारहाण झाल्याचं वृत्तपत्रात छापून आलेलं वृत्तही त्यांनी शेअर केलं आहे.
“माझ्या भावाला या अवस्थेत पाहून मला अतीव दु:ख होत आहे. एका आईनं आपल्या सुरक्षारक्षकांकरवी आपल्या एका मुलाला इतक्या बेदमपणे मारहाण करावी की त्याचा हात कायमचा निकामी व्हावा, हे धक्कादायक आहे. त्याची एकच चूक होती. ती म्हणजे त्यानं एका मीटिंगला उपस्थिती लावली. या भयानक गुन्ह्यासाठी कंपनीचे सर्व बोर्ड मेंबर्स दोषी आहेत. माझ्या सहवेदना समीर मोदीसोबत आहेत”, असं ललित मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मोदी कुटुंबात संपत्तीचा काय आहे वाद?
ललित मोदींनी ही पोस्ट करण्याच्या एक दिवस आधी, अर्थात ३१ मे रोजी समीर मोदींनी दिल्ली पोलिसांकडे आई बिना मोदीविरोधात तक्रार दाखल केली. आपल्या आईनं तिच्या वैयक्तिक सुरक्षा रक्षकांकरवी आपल्याला गंभीर इजा पोहोचवली असल्याचं समीर मोदी यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. यात गॉडफ्रे फिलीप्सचे इतर संचालकही सहभागी असल्याचं त्यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. कपनीच्या जसाला येथील कार्यालयात कंपनीच्या नियोजित बैठकीसाठी जाण्याचा प्रयत्न केला असता ही मारहाण करण्याच आल्याचा दावा तक्रारीत केला आहे.
“हे सगळं गुरुवारी घडलं. मी बैठकीच्या खोलीत जाण्याचा प्रयत्न करत असताना बिना मोदींच्या वैयक्तिक सुरक्षारक्षकांनी रोखलं. जेव्हा मी आग्रह केला, तेव्हा त्यांनी मला ढकलून दिलं आणि बैठकीत जायची मला परवानही नसल्याचं सांगितलं. माझ्या मालकीचे कंपनीतील शेअर्स विकण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यासाठी हे सगळं करण्यात आलं”, असं समीर मोदींनी तक्रारीत म्हटलं आहे.