मायेची शाल आणि छातीची ढाल बनून माताभगिनींसाठी तत्पर : तुषार कामठे
पिंपळे निलख येथे हळदी कुंकू समारंभ व खेळ पैठणीचा कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
![Maya, shawl, chest, shield, mother sister, Tatkal, Tushar Kamthe,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/pimpale-780x470.jpg)
पिंपळे निलख : ‘माझ्या कुठल्याही माताभगिनीवर कसलाही अन्याय अत्याचार झाला तर हा तुषार गजानन कामठे तुमचा भाऊ तुमचा मुलगा म्हणून मायेची शाल आणि छातीची ढाल बनून माताभगिनींसाठी तत्पर असेल’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केले. तुषार गजानन कामठे सोशल फाउंडेशन च्या वतीने पिंपळे निलख येथे महिला भगिनींसाठी आयोजित भव्य हळदी कुंकू समारंभ व खेळ पैठणीचा, सन्मान महिलांचा या कार्यक्रमात ते बोलत होते.
वसंत पंचमीचे औचित्य साधत तुषार कामठे यांनी खास महिला भगिनींसाठी हळदी कुंकू व खेळ पैठणीचा हा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सुप्रसिद्ध निवेदक संदीप पाटील यांनी यावेळी सूत्रसंचालन करत महिला भगिनींना विविध खेळ, गाणी मनोरंजनात्मक किस्से सांगून रंगत आणली. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू यावेळी देण्यात आल्या. तसेच पहिल्या तीन विजेत्या महिलांना अनुक्रमे स्मार्ट टीव्ही सह मानाची पैठणी, फ्रिज आणि कुलर अशी बक्षिसे यावेळी देण्यात आली. त्याचबरोबर लकी ड्रॉ च्या माध्यमातून तीन महिलांना सोन्याची नथही यावेळी देण्यात आली.
हेही वाचा – कचरा करणाऱ्यांकडून एका महिन्यात ६० लाखांची दंडवसुली
महिलांसाठी पिंक ई-रिक्षा योजना
महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्याद्वारा, महिला व युवतींना आत्मनिर्भर, स्वावलंबी, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी पिंक ई-रिक्षा योजना महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे, या योजनेची सविस्तर माहिती देत कार्यक्रमाच्या ठिकाणी तीन गरजू महिला भगिनींना पिंक ई रिक्षाचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर पहिल्या दहा इच्छुक महिलांचे डाऊन पेमेंट तुषार कामठे यांच्या वतीने दिले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. पिंक ई रिक्षा योजना ही महिला भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना आहे, यामध्ये सरकारी अनुदानातून महिलांना पर्यावरणपूरक ई-रिक्षा 70 टक्के कर्जाच्या माध्यमातून मिळणार आहे, लाभार्थी महिलांना केवळ 10 टक्के खर्च करावा लागणार असून कर्जाच्या परतफेडीसाठी 5 वर्षे कालावधी असेल. या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन तुषार कामठे यांनी यावेळी केले.
माता भगिनींच्या रक्षणासाठी तत्पर
2017 साली नगरसेवक म्हणून पिंपळे निलख वासियांनी मला काम करण्याची संधी दिली, तेव्हापासून करदात्या नागरिकांच्या न्याय व हक्कासाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संघर्ष करत आलो, जनतेच्या हिताविरुद्ध होत असलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी सत्तेत असताना राजीनामा देणारा मी नगरसेवक होतो, अत्यंत संघर्ष करून मायबाप जनतेच्या आशीर्वादाने कोट्यावधीची कामे या प्रभागात करू शकलो याचा अभिमान वाटतो.. यापुढेही जनतेच्या हितासाठी अहोरात्र कटीबद्ध राहणार असून माता भगिनींवर अन्याय अत्याचार सहन केला जाणार नाही, सर्व माता भगिनींच्या संरक्षणासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असेल असा शब्द देतो.. असे मनोगत यावेळी तुषार कामठे यांनी व्यक्त केले.