अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात कोविड योद्ध्यांचा सन्मान
पुणे: राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने कोरोना काळात अविरत काम करणाऱ्या कोविड योद्ध्यांचा प्रदेश कार्यालयात सन्मान करण्यात आला. डॉ. प्रविण बांगर – केईएम रुग्णालय, मनपातील दुय्यम अभियंता (ए वार्ड) अरुण वैद्य, आरोग्य सेवेतील रुग्णवाहिका चालक विठ्ठल बाबर,राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व विघ्नहर प्रतिष्ठानचे महेंद्र पानसरे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
अजितदादांना भेटण्यासाठी येणाऱ्या गर्दीतल्या कोणत्याही माणसाला विचारले तर तो सांगतो आमच्यासाठी हक्काचे ठिकाण म्हणजे अजितदादा पवार… ही दादांची खरी ताकद आहे. दादांची कमिटमेंट ही माणुसकीची असते. सत्ता हे केवळ साधन आहे, मला सत्ताधीश व्हायचं नाही तर साधनधीश व्हायचं आहे, असे दादांचे काम असल्याचे माजी आमदार, कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सांगितले.
यावेळी मनपातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या नगरसेविका राखी जाधव, राष्ट्रवादी मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सत्कारमूर्ती डॉ. प्रवीण बांगर यांनीदेखील आपले विचार मांडले. कार्यक्रमास प्रदेश चिटणीस संजय बोरगे, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, बेस्ट समितीचे सदस्य बबन कनावजे, दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष विजय वाडकर, अजितदादांचे स्वीय सहाय्यक डिकले उपस्थित होते.