जळगाव महापालिकेचा ‘सत्तांतर पॅटर्न’ राज्यातही, शिंदेंनीच सेनेत आणलेल्या भाजप बंडखोरांमध्ये अस्वस्थता
![Jalgaon Municipal Corporation's 'independence pattern' in the state too, unrest among BJP rebels brought into the army by Shinde himself](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/Jalgaon-Municipal-Corporations-independence-pattern-in-the-state-too-unrest-among-BJP-rebels-brought-into-the-army-by-Shinde-himself.png)
जळगाव : जळगाव महापालिकेत भाजपाची सत्ता असतांना शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच भाजपाच्या २७ नगरसेवकांनी बाहेर पडून महापौर निवडणुकीत शिवसेनाला मतदान करीत सत्तातंर केले होते. कुठलाही गट न स्थापन करतांना आम्हीच भाजपाचे खरे नगरसेवक असल्याची भूमिका या नगरसेवकांनी घेतली आहे. आता राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारत आम्ही शिवसेनेचे आहोत अशी भूमिका घेत बंडाळी केली आहे. त्यामुळे जळगावचा सत्तातंराचा पॅटर्न राज्यातही यशस्वी होतो का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने गेल्या दोन दिवसांपासून राज्यात खळबळ उडाली आहे. याच एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत जळगाव महापालिकेत बहुमतात असलेल्या भाजपाचे २७ नगरसेवक फोडून भाजपाला सत्तेतून पायउतार केले होते. त्यानतंर महापौर निवडणुकीत या २७ नगरसेवकांनी विकासाचा मुद्दा पुढे करीत शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करुन सत्तांतर करीत शिवसेनेचा महापौर निवडून दिला. त्यावेळी या भाजपाच्या बंडखोर नगरसेवकांचे नेतृत्व करणारे कुलभुषण पाटील यांनी उपमहापौर पद मिळाले होते. तेव्हापासून जळगाव महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता आहे.
बंडखोरांचाही गटनेता
विशेष म्हणजे शिवसेनेला मतदान करणाऱ्या या भाजपाच्या २७ नगरसेवकांनी वेगळा गट न स्थापन करता आमच्याकडे जास्त नगरसेवक असल्याने आम्हीच खरे भाजपाचे नगरसेवक असल्याची भूमिका घेत भाजपाचे गटनेते भगत बालाणी यांची हकालपट्टी करीत असल्याचे सांगत बंडखोरांमधील अॅड. दिलीप पोकळे यांना गटनेते जाहीर केले. आजही भाजपाचे गटनेते भगत बालाणी का? दिलीप पोकळे हा वाद जळगाव महापालिकेत कायम आहे. याबाबतची याचिका विभागीय आयुक्तांकडे व न्यायालयात देखिल दाखल करण्यात आली आहे. याच पध्दतीने आता राज्यात देखील योगायोगाने एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतच बंड पुकारले असून त्यांनी आम्हीच शिवसेनेचे असून शिवसेनेने नियुक्त केलेला गटनेते अजय पाटील मान्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जळगाव महापालिकेच्याच धर्तीवर आता राज्यात देखील सत्तांतराचा रणनिती आखली जाण्याची शक्यता आहे.
जळगाव मनपातील बंडखोर अस्वस्थ
जळगाव महापालिकेत मार्च २०२१ मध्ये झालेल्या सत्तांतरात भाजपाच्या २७ नगरसेवकांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपविरोधात बंडखोरी करीत शिवसेनेला सत्ता मिळवून दिली. एकनाथ शिंदे यांनीच शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यामुळे जळगाव महापालिकेतील शिवसेनेच्या बंडखोर नगरसेवकांची अस्वस्थता वाढली आहे. या बंडखोरांविरोधात भाजप नेते गिरीश महाजन यांच्या सुचनेनुसार अपात्रतेच्या कारवाईसाठी विभागीय आयुक्तांकडे याचिका प्रलंबित आहेत. राज्यातील या नव्या राजकीय समिकरणांमुळे आपले काय होणार? असा प्रश्न या नगरसेवकांना पडला आहे.