Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

उमेश कोल्हेंच्या हत्येचे आंतरराष्ट्रीय परिणाम; समाजात दहशत पसरवणे हाच उद्देश या हत्येमागे होता’

मुंबई: ‘अमरावतीमधील औषध विक्रेता व्यावसायिक (केमिस्ट) उमेश कोल्हे यांच्या हत्येचे परिणाम हे केवळ देश पातळीवर नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत. समाजात दहशत पसरवणे हाच उद्देश या हत्येमागे होता’, असा दावा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी विशेष एनआयए न्यायालयात केला. तसेच सर्व सात आरोपींची कोठडी आणखी आठ दिवसांनी वाढवावी, अशी विनंती न्यायालयाला केली. त्यानंतर न्यायालयाने आरोपींची एनआयए कोठडी २२ जुलैपर्यंत वाढवली.

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचे समर्थन करणारी पोस्ट उमेश यांनी व्हॉटसअॅपवर फॉरवर्ड केली, या रागातून कट रचून त्यांची हत्या करण्यात आली, असा संशय आहे. उमेश हे २१ जून रोजी रात्री आपल्या दुकानातून घरी परतत असताना अमरावतीमधील घंटाघर परिसरात त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी हत्येच्या कटाचा कथित सूत्रधार शेख इरफान शेख रहिम याच्यासह मुदस्सर अहमद (२२), शाहरुख पठाण (२५), अब्दुल तौफिक (२४), शोएब खान (२२), अतिब रशीद (२२) व युसुफ खान (३२) या सात जणांना अटक केली. राजस्थानमधील उदयपूरमध्येही नुपुर शर्मांच्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या एका शिंप्याची हत्या झाल्यानंतर त्या प्रकरणाचा तपास एनआयए करत होती. त्यामुळे उमेश यांच्या हत्येचा तपासही एनआयएने आपल्याकडे घेतला आणि सर्व सात आरोपींविरोधात बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यासह (यूएपीए) अन्य कायद्यांतील कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यांची एनआयए कोठडीची मुदत संपत असल्याने एनआयएने त्यांना शुक्रवारी पुन्हा न्यायालयात हजर केले.

‘हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. या हत्येचे परिणाम हे केवळ देश पातळीवर नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत. समाजात दहशत पसरवण्याच्या उद्देशानेच आरोपींनी कट रचून ही हत्या केली. या प्रकरणातील आणखी एक संशयित आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. तीन आरोपींच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या कॉल्सचा तपशील मिळाला आहे. अटकेत असलेल्या आरोपींना राजस्थानमध्ये नेऊन अधिक चौकशी करायची आहे. त्यामुळे सर्वांची कोठडीत आठ दिवसांनी वाढवावी’, अशी विनंती एनआयएच्या वकिलांनी केली. तर ‘उमेश यांची हत्या ही उदयपूरमधील हत्येच्या घटनेपूर्वीच झाली. मित्रांमधील भांडणातून ती झाली आहे. मात्र, तपास संस्था जाणीवपूर्वक त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणात आरोपींना यूएपीए कायदा लावण्याला कोणताही आधार नाही’, असे म्हणत कोठडी वाढवण्याच्या एनआयएच्या विनंतीला आरोपींच्या वकिलांनी विरोध दर्शवला. अखेरीस दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने एनआयए कोठडी २२ जुलैपर्यंत वाढवली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button