भाडेतत्त्वावरील ‘बेस्ट’ बसगाडय़ांत वाढ
![increase-in-best-buses-on-rental-basis](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/mv-bus-1.jpg)
मुंबई | बेस्ट उपक्रमाने स्वमालकीऐवजी भाडेतत्त्वावरील बस घेण्यावरच अधिक भर दिला आहे. आणखी १२०० विजेवर धावणाऱ्या वातानुकूलित बसचा प्रस्ताव उपक्रमाने तयार केला असून महाराष्ट्र शुध्द हवा अभियानांतर्गत या बस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्ट समितीमधील भाजपच्या सदस्यांनी त्यास आक्षेप घेतला असून ताफ्यातील स्वमालकीच्या बसगाडय़ांची संख्या न वाढवता भाडेतत्त्वावरील बस घेण्यावर भर देण्यात येत आहे. ही बाब योग्य नाही. मालकीच्या बसगाडय़ा खरेदी करण्यासंदर्भातील उपक्रमाचे धोरण स्पष्ट होत नाही. यापूर्वी उपक्रमाने आपल्या ताफ्यात स्वमालकीच्या ३३६७ बसगाडय़ा समाविष्ट करण्याबाबत घोषणा केली होती. मात्र त्याचे पालन होत नसल्याचा आरोप भाजप सदस्यांनी केला.
स्वमालकीच्या बस खरेदी करण्याऐवजी भाडेतत्त्वावरील बस घेण्यावर बेस्ट उपक्रमाने गेल्या चार ते पाच वर्षांत भर दिला आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात ३ हजार ४६० बसगाडय़ा असून यात १ हजार ९०६ बेस्टच्या स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील १ हजार ५५४ बस आहेत.