विदर्भात मंत्रीपदासाठी शिंदेगट व भाजपमध्ये रस्सीखेच; संजय राठोडांना पुन्हा संधी मिळणार का?
![In Vidarbha, there is a tug of war between Shindegat and BJP for ministerial posts; Will Sanjay Rathore get another chance?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/In-Vidarbha-there-is-a-tug-of-war-between-Shindegat-and-BJP-for-ministerial-posts-Will-Sanjay-Rathore-get-another-chance.jpg)
नागपूरः महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भारतीय जनता पक्ष सत्तेसाठी दावा करणार आहे. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस राहण्याची दाट शक्यता असल्याने नवीन मंत्रिमंडळात विदर्भातून कुणाला संधी मिळते, याची उत्सुकता आता कार्यकर्त्यांना लागली आहे. दरम्यान, बुधवारी रात्री शहरात भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आतषबाजी करीत तसेच मिठाई वाटून आनंद साजरा केला.
मुंबईतील राजकीय घडामोडींमुळे ठाकरे सरकारचे काय होणार, अस्थिरता दूर होईल का, कुणाची सत्ता येईल, ही उत्कंठा बुधवारी रात्री संपुष्टात आली. राज्यातील राजकीय संकटामुळे होणाऱ्या बदलात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नागपूरला परत सिंहासन मिळते का, याचीही जोरदार चर्चा दोन दिवसांपासून सुरू होती. सर्वत्र हाच चर्चेचा सूर ऐकू येत होता. त्यावर शिक्कामोर्तब होण्याचा मुहूर्त निघायचा असून नव्या सरकारकडे लक्ष लागले आहे. फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात विदर्भाचा बोलबोला होता. आताही तितकेच राहतात की त्याहून अधिक मंत्री याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळातील काही सदस्यांना परत संधी मिळण्याची शक्यता बळावली आहे. ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार अग्रणी राहतील. नागपुरात रस्सीखेच होण्याची शक्यता बोलली जात आहे. ग्रामीणमधून चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत समीर मेघे प्रबळ दावेदार मानले जातात. शहरात कृष्णा खोपडे आणि मोहन मते इच्छुकांमध्ये आहेत.
भाजपच्या कोट्यातून संजय कुटे, प्रा. अशोक उईके, रणधीर सावरकर, परिणय फुके, दादा केचे, रवी राणा, शिंदे गटातून संजय राठोड, बच्चू कडू, डॉ. संजय रायमुलकर, संजय गायकवाड, नरेंद्र भोंडेकर, आशिष जयस्वाल अशी प्रबळ दावेदारांची नावे चर्चेत आली आहेत.