घरचे काम, नारळपाणी…; आमदारांनी शिवसेनेला दिलेल्या गुंगाऱ्याची सुरस कहाणी
![Housework, coconut water ...; The fragrant story of Gungara given by MLAs to Shiv Sena](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/Housework-coconut-water-...-The-fragrant-story-of-Gungara-given-by-MLAs-to-Shiv-Sena.jpg)
मुंबईः शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे विधान परिषदेच्या निवडणूक निकालानंतर शिवसेनेच्या काही आमदारांसह सुरतला निघून गेले. मात्र त्यानंतर त्यांच्या गटात सामील होणाऱ्या शिवसेनेचे इतर आमदार कशा पद्धतीने शिवसेनेला गुंगारा देऊन निसटले, त्याच्या सुरस कथाच पुढे आल्या आहेत!
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे पदाधिकारी सावध झाले होते. त्यामुळे या सर्व आमदारांनी मुंबई विमानतळावरून जाण्याचे जाणीवपूर्वक टाळले. तलासरी येथील मुंबई-गुजरातच्या सीमेवर पोहोचायचे आणि तेथून गुजरात पोलिसांच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये सुरत गाठायचे, असा मार्ग त्यांनी अवलंबिला. तेथून विमानाने त्यांचा गुवाहाटीला प्रवास व्हायचा. मात्र तत्पूर्वी शिवसेनेच्या, तसेच युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या कल्पना लढविल्या.
कुणी, कसा शोधला मार्ग?
आमदार मंगेश कुडाळकर : कुडाळकर यांनी त्यांच्या सोबतच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत कुर्ला येथील कायार्लयात नारळ पाणी प्यायले. नारळपाणी प्यायल्यानंतर, आलोच दोन मिनिटांत, असे सांगून बाहेर जात ते तेथून निसटले.
आमदार योगेश कदम : मध्यरात्री अडीच वाजता कांदिवलीच्या घरी महत्त्वाचे काम आहे, असे सांगून कदम निघाले. त्यांच्यासोबत युवा सेनेचा एक पदाधिकारी होता. मात्र रस्त्यात त्यांनी या पदाधिकाऱ्याला धक्काबुक्की करीत खाली उतरवले आणि भरधाव गाडी घेऊन ते निसटले.
आमदार सदा सरवणकर : शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्यांविरोधात शिवसेना भवनासमोर आंदोलन करण्यात आले. त्यात आमदार सदा सरवणकर आणि त्यांच्या कन्या हे दोघेही बंडखोरांच्याविरोधात घोषणाबाजी करायला आघाडीवर होते. मात्र त्यानंतर काही तासांतच त्यांनी गुवाहाटीचा रस्ता धरला.
मंत्री गुलाबराव पाटील : गुलाबराव पाटील हे दोन वेळा मुंबईतील हॉटेलमधून जाणीवपूर्वक बाहेर पडले होते. सोबतच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विचारल्यावर, ‘अहो, मी कशाला पळणार आहे, मी तर कडवट सैनिक आहे’, असे जोशात बोलायचे. त्यानंतर तिसऱ्या वेळी मात्र गाडीतून काही तरी आणायचे आहे, असे सांगत त्यांनी पोबारा केला!
कृषिमंत्री दादा भुसे : भुसे यांना शिवसेनेचे पदाधिकारी गाडीत बसवून आमदारांच्या बैठकांना घेऊन जायचे तेव्हा भुसे त्यांच्यावर संतप्त व्हायचे. आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत, आम्हाला गुन्हेगारांसारखी अशी वागणूक देणे योग्य नाही, असे ते त्यांना बजावायचे. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावरची नजर काहीशी हटवली होती. त्याचाच फायदा घेत भुसे तेथून निसटले.
मुख्यमंत्र्यांकडून सही!
एका आमदाराने तर आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत, असा पदाधिकाऱ्यांपुढे बनाव केला. यावर कळस म्हणजे ‘वर्षा’वर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याकडून विकासकामाच्या फाइलवर त्यांनी सही करून घेतली आणि त्यानंतर कोणालाही कळणार नाही अशा पद्धतीने मुंबई सोडली.