TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या रुपाने शिवसेनेत ऐतिहासिक फूट; जखमी शिवसेनेचा मोर्चा आता मोदींकडे; एकनाथ शिंदेंनाही विचारला खरपूस सवाल

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या रुपाने शिवसेनेत ऐतिहासिक फूट पडली आहे. याआधीही अनेक दिग्गज नेत्यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला होता, मात्र शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर न पडता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उघड आव्हान दिलं आहे. शिंदे यांनी शिवसेनेच्या ५५ पैकी ४० आमदारांना सोबत घेत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्यास भाग पाडलं आणि भाजपच्या मदतीने ते मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. तसंच आता आमची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा दावा बंडखोर शिंदे गटाकडून केला जात आहे. या माध्यमातून थेट ठाकरे कुटुंबाच्या अस्तित्वालाच हादरा देण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यात घडलेल्या या सर्व राजकीय नाट्यामागे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा हात असल्याचं बोललं जातं. या पार्श्वभूमीवर बंडखोरांवर टीका करणाऱ्या शिवसेनेनं आपला मोर्चा थेट केंद्रातील मोदी सरकारकडे वळवला असून महागाईच्या मुद्द्यावरून केंद्रावर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.

‘केंद्रातील राज्यकर्ते सध्या राज्या-राज्यांतील विरोधकांची सरकारे अस्थिर करण्यात मग्न आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे ‘चिंतामग्न’ झालेल्या सामान्य माणसाची काळजी वगैरे करण्याशी त्यांचा संबंध राहिलेला नाही. देशातील महागाईने मागील आठ वर्षांतील उच्चांक तर गाठलाच आहे, पण त्या उच्चांकात भरच घालण्याचे काम सध्याचे सत्ताधारी करीत आहेत,’ अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. केंद्र सरकारवर टीका करत असताना शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे.

एकनाथ शिंदेंना विचारला सवाल

‘महाराष्ट्रात बेइमानीने स्थापन झालेल्या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी नवसत्ताधाऱ्यांनी ‘पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करून राज्यातील सामान्य जनतेला दिलासा देऊ,’ अशी शेखी मिरवली होती. त्या दिलाशाचे सोडा, आता स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर पुन्हा महाग करून जो महागाईचा तडाखा सामान्य जनतेला तुमच्या त्या ‘महाशक्ती’ने दिला आहे, त्यावर तुमचे काय म्हणणे आहे?’ असा खरपूस सवाल शिवसेनेनं केला आहे.

दरम्यान, ‘उच्चांकी महागाईने देशातील सामान्य जनता जगण्या-मरण्याच्या कोंडीत सापडली आहे. या कोंडीतून तिला ज्यांनी बाहेर काढायचे ते महागाई कमी करण्याऐवजी विरोधकांची सरकारे अस्थिर करण्यात, २०२४ मध्ये स्वपक्षाला ‘स्थिर’ करण्यात आणि देशाला जागतिक लिडर वगैरे कसे केले या ‘आत्मानंदा’त मशगुल आहेत. ‘आत्ममग्न’ सरकार आणि ‘चिंतामग्न’ जनता अशी आपल्या देशाची सध्याची अवस्था आहे,’ असं म्हणत शिवसेनेनं महागाईच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button