महागाईने त्रस झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी; खाद्यतेल लवकरच स्वस्त होणार
![Good news for inflation-stricken citizens; Edible oil will soon become cheaper](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Good-news-for-inflation-stricken-citizens-Edible-oil-will-soon-become-cheaper.jpg)
मुंबई | महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना आगामी गणेशोत्सवात काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. सध्या उच्चांकावर गेलेले खाद्यतेलाचे दर येत्या दीड ते दोन महिन्यांत घसरण्याची शक्यता आहे. या दरकपातीचे थेट सकारात्मक परिणाम गणेशोत्सवादरम्यान दिसतील, असे संकेत आहेत.
भारत हा खाद्यतेल आयात करणारा जगातील सर्वांत मोठा देश आहे. मसालेदार, चमचमीत व फोडणीच्या खाद्यपदार्थांमुळे भारतात तेलाला मोठी मागणी असते. एकूण गरजेच्या ६० ते ६५ टक्के तेल आयात केले जाते. यामध्ये पामतेल सर्वाधिक प्रमाणात आयात होते. इंडोनेशिया व त्यापाठोपाठ मलेशियातून या तेलाची निर्यात होते. त्यापाठोपाठ देशात सोयाबीन व सूर्यफुलाच्या तेलाची आयात होते. पामतेलाचा वापर रेस्टॉरंट, हॉटेल व विविध खाद्यान्न स्टॉल्सधारकांकडून सर्वाधिक होतो. या स्थितीत आयात पामतेलाच्या दरात सुमारे २२ टक्के घट झाली आहे. तसेच मलेशियाने पामतेलाच्या निर्यातदरात सुमारे १२ टक्के घट केली आहे. त्यामुळे सध्या उच्चांकावर गेलेले देशांतर्गत खाद्यतेलाचे दर आता हळूहळू घसरण्याची आशा निर्माण झाली आहे.
‘मलेशियाने जुलै महिन्यासाठी पामतेल निर्यात दरात याआधीच कपात केली होती. हा दर ६८१६.०५ डॉलर प्रति टनावरून ६७३२.२६ डॉलर प्रति टन केला आहे. यामुळे पुढील महिन्यात तेथून आयात होणारे तेल हे स्वस्त असेल. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेल दरात घट होत असताना इंडोनेशियाने पामतेलाचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही बाबींमुळे येत्या काळात पामतेलाच्या दरात घट होताना दिसेल. त्याचे परिणाम अन्य सर्वच तेलांवर होतील, अशी चिन्हे आहेत’, अशी माहिती अखिल भारतीय खाद्यतेल असोसिएशनचे अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी दिली.
खाद्यतेलाचे दर (प्रतिलिटर रुपये)
प्रकार एप्रिलमध्ये सध्या
पाम १२५-१३५ १४०-१४५
सोयाबीन १४५-१५० १६५-१७५
सूर्यफूल १५५-१६० १८५-१९५
शेंगदाणा १७५-१९५ १९५-२२५
राईसब्रान १४०-१४५ १६०-१७०