मागील नऊ वर्षांपासून केंद्रामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली सेवा, सुशासन आणि गरिबांचे कल्याण करत देशाची संपन्नतेकडे वाटचाल – गौरव गौतम
![Back Nine, Modi at the Centre, Service under Leadership, Good Governance, Welfare of the Poor, Country's Progress towards Prosperity, Gaurav Gautam,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Gaurav-Ponam-780x470.png)
पिंपरी : मागील नऊ वर्षांपासून केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार आहे. या नऊ वर्षात सेवा, सुशासन आणि गरिबांचे कल्याण करीत भारत देशाची संपन्नतेकडे वाटचाल सुरू आहे. गेल्या ९ वर्षांमध्ये महाराष्ट्रात आणि देशात केंद्र सरकारने अनेक लोक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. याची माहिती नागरिकांना घरोघरी जाऊन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव गौरव गौतम यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली.
आज बुधवारी (दि.१४) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संकेत चोंधे, माजी नगरसेवक व भाजपा जिल्हा सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, पिंपरी चिंचवड प्रभारी गणेश वरपे तसेच युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य सचिन जायभाय, अजित कुलथे, अक्षय नलावडे आदी उपस्थित होते.
यावेळी राहुल लोणीकर यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा सरचिटणीस तथा युवा मोर्चा प्रभारी विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य जनतेला उपलब्ध करून दिलेल्या विविध योजना आणि प्रत्यक्ष लाभार्थी यांची माहिती देण्यासाठी कार्यरत आहे. भाजपाने नऊ वर्ष भ्रष्टाचार मुक्त आणि अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने देशाचा कारभार केला आहे. हे सर्वसामान्य जनतेला अवगत आहे. ९ वर्षाची विकासाची वाटचाल जनतेपर्यंत पोहोचवण्यात भारतीय जनता युवा मोर्चा विविध कार्यक्रमातून युवकांशी संपर्क साधत आहे. ९ वर्षे देशात प्रगतीची विकास गंगा आलेली आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कोट्यावधी लोकांपर्यंत केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचला आहे. युवा वर्ग हेच देशाचे भविष्य असून एखादा उपक्रम युवा वर्गाने हाती घेतल्यास समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत तो उपक्रम पोहोचवला जातो. म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने भारतीय जनता युवा मोर्चाकडे विविध उपक्रम सोपवले आहेत.
भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे यांनी सांगितले की, ३० मे ते ३० जून २०२३ या दरम्यान होणाऱ्या महाजनसंपर्क अभियानात सक्रिय सहभाग घेऊन शहरात सर्वत्र घर चलो अभियान राबविण्यात येणार आहे. नवमतदार नोंदणी अभियान अंतर्गत
७ जून ते २० जून नवमतदार नोंदणी, प्रति मंडल ५००० पेक्षा अधिक मतदार नोंदणी करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात युवा संवाद संमेलन, युवा वॉरिअर्स शाखा उदघाटन, लाभार्थी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी “मन कि बात” कार्यक्रमामध्ये उल्लेख केलेल्या आपल्या जिल्ह्यातील विशेष व्यक्तींची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. १० ते २० जून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २५ जून रोजी विदयार्थी विभागाच्या माध्यमातून ऑनलाईन प्रश्नमंजुषा कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची ध्येयधोरणे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने घेतलेल्या समाज उपयोगी निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पिंपरी चिंचवड भाजपा युवा मोर्चा काम करीत आहे.