महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या खुर्चीसाठी ८४ हजार रुपयांचा खर्च; प्रशासकीय राजवटीतही उधळपट्टी सुरूच
![Expenditure of Rs. 84,000 for additional Municipal Commissioner's chair; Waste continues even in the administrative regime](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/-अतिरिक्त-आयुक्तांच्या-खुर्चीसाठी-८४-हजार-रुपयांचा-खर्च-प्रशासकीय-राजवटीतही-e1652685068822.jpg)
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर प्रशासनाच्या हाती कारभार गेला असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांचा थाटमाट चांगलाच वाढला आहे. महापालिका मुख्य इमारतीतील अतिरिक्त आयुक्तांच्या कक्षातील बैठक व्यवस्थेकरिता सोफासेट आणि खुर्च्या खरेदी करण्यात येणार आहेत. त्यामध्ये तीन सोफासेटसाठी १ लाख ८७ हजार तर एका खुर्चीसाठी ८४ हजार रुपये असा एकूण २ लाख ७१ हजार रुपये खर्च होणार आहे. या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्त आहेत. विकास ढाकणे, जितेंद्र वाघ आणि उल्हास जगताप हे काम पाहत आहेत. ढाकणे आणि वाघ हे शासन प्रतिनियुक्तीवर आले आहेत. तर जगताप यांना सेवाज्येष्ठतेनुसार अतिरिक्त आयुक्त पदावर प्रभारी आहेत.
बैठक व्यवस्था बदलण्यात येणार
अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांच्या कक्षातील बैठक व्यवस्था बदलण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन खुर्ची, सोफासेट खरेदी करण्यात येणार आहे. ढाकणे यांच्या कक्षात तीन सोफासेट नव्याने घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये ४९ हजार रुपये किमतीचा एक आसनी, ६२ हजार रुपये किमतीचा दोन आसनी आणि ७५ हजार रुपये किमतीचा तीन आसनी सोफासेट खरेदी करण्यात येणार आहे. तसेच ढाकणे यांच्यासाठी एक एक्झिक्युटिव्ह खुर्चीही घेण्यात येणार आहे. तिची किंमत तब्बल ८४ हजार रुपये आहे. त्यानुसार तीन सोफासेट आणि एका खुर्चीसाठी एकूण २ लाख ७१ हजार रुपये खर्च होणार आहे.