खळबळजनक! नकली सोने देत चार अनोळखी व्यक्तींकडून ४ लाखांची फसवणूक
![Exciting! Fraud of Rs 4 lakh from four strangers for giving fake gold](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/Exciting-Fraud-of-Rs-4-lakh-from-four-strangers-for-giving-fake-gold.jpg)
जळगाव | जळगाव शहरातील एका दांम्पत्याची अनोळखी व्यक्तींनी फसवणूक केल्याने खळबळ उडाली आहे. खोदकामात सोन्याचे दागिने सापडले असून ते विकायचे आहे असे सांगत चार अनोळखी व्यक्तींनी ४ लाख २० हजार रुपयात या दाम्पत्याची फसवणूक केली आहे.
सुभाष रामदास लोखंडे (वय ५४, रा. विश्वदीप कॉलनी, पिंप्राळा) पत्नीसह १३ जून रोजी जूने बी. जे. मार्केट परिसरात खरेदीसाठी आले होते. यावेळी त्यांना तेथे दोन अनोळखी पुरूष भेटले. ‘खोदकामात आम्हाला लाखो रुपयांचे दागिने सापडले आहेत, तुम्हाला पाहिजे असतील तर कमी पैशात देऊ’ असे त्यांनी सांगीतले. या दोघांवर विश्वास ठेऊन लोखंडे दाम्पत्याने सोने खरेदीची तयारी दाखवली. यानंतर त्या दोघांनी दाम्पत्यास एक सोन्याचा मणी दिला. दाम्पत्याने सराफाकडे नेऊन तपासला असता तो मणी खरा होता. यामुळे त्यांचा विश्वास बसला.
यानंतर अनोळखींनी सुभाष लोखंडे यांचा फोन नंबर घेतला. दोन-तीन दिवस त्यांच्यात संवाद सुरू होता. यानंतर १७ जून रोजी भामट्यांनी लोखंडे यांना पांडे चौकात पैसे घेऊन बोलावले. यावेळी एका महिलेसह चार भामटे चौकात थांबून होते. लाखंडे यांनी भामट्यांना ४ लाख २० हजार रुपये दिले. एक पिशवी लाेखंडेंच्या हातात दिली आणि लवकर घरी जा असा निरोप देऊन भामटे तेथून पसार झाले.
सुभाष लाेखंडे यांनी २१ जून रोजी भामट्यांकडून मिळालेले सोने सराफाकडे तपासणीसाठी नेले. त्यांनंतर करण्यात आलेल्या तपासणीत ते सोने नकली असल्याचे निष्पन्न झाले. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर अखेर लोखंडे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी लोखंडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.