एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते, उद्धव ठाकरे यांना सगळ्यात मोठा धक्का
![Eknath Shinde is the biggest blow to Shiv Sena group leader Uddhav Thackeray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Eknath-Shinde-is-the-biggest-blow-to-Shiv-Sena-group-leader-Uddhav-Thackeray.jpg)
मुंबई :एकनाथ शिंदे सरकारने आज विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून महाविकास आघाडीला पहिला धक्का दिला. त्या धक्क्यातून मविआ सावरत नाही तोच उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का बसला आहे. कारण एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते असल्याचं पत्र विधिमंडळ सचिवालयाने शिंदे यांना दिलं आहे. तसेच अजय चौधरी यांची गटनेते म्हणून नियुक्ती देखील रद्द केली आहे. त्यानंतर विधिमंडळ सचिवालयाच्या कारवाईला आम्ही न्यायालयात आव्हान देऊ, अशी भूमिका शिवसेनेने आता घेतली आहे. दरम्यान, शिवसेना आणि शिंदे गटातील ही कायदेशीर लढाई आणखी धारदार होण्याची शक्यता आहे.
संविधानाची खिल्ली उडवण्याचं काम सुरु आहे. लोकसभेच्या माजी सचिवांनी गटनेता कुणाला करायचा हा अधिकार पक्षाला असतो, असं सांगितलं होतं. पण सध्या सुरु असेललं सगळं बेकायदेशीरपणे सुरु आहे. राज्यघटनेची पायमल्ली करण्याचं काम सुरु आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. देश हुकूमशाहीकडे कसा चालला आहे हे दिसून येत आहे, अशी टीका अरविंद सावंत यांनी केला. विधिमंडळ सचिवालयाच्या कारवाईला आम्ही न्यायालयात आव्हान देऊ, असं अरविंद सांवत म्हणाले.
विधिमंडळ सचिवालयाने एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रात काय म्हटलंय?
२२ जून रोजी विधानसभा उपाध्यक्ष यांना पत्रानुसार ठराव पाठवला होता. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना पदावरुन हटवून अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती केली होती. ती रद्द करुन एकनाथ शिंदे यांची ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी करण्यात आलेली गटनेते पदाची नियुक्ती कायम ठेवण्यात आली असून मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. तर, भरतशेठ गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे, असं विधिमंडळ सचिवालयानं एकनाथ शिंदे आणि भरतशेठ गोगावले यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.