कमी बॉल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात ईडी सरकार ‘रनआऊट’ होईल ः राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना टोला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/NCP-Run-Out.png)
मुंबई । महाईन्यूज। विशेष प्रतिनिधी ।
कमी बॉल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात हे ईडी सरकार लवकरच ‘रनआउट’ होईल असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. मुंबई मेट्रो ३ च्या चाचणीला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी एखादा प्रकल्प चल रहा है, चल रहा है… सरकारी काम सहा महिने थांब असं आम्हाला काही करायचं नाही. आम्हाला कमी वेळात जास्त काम करायचं आहे. आम्हाला पूर्ण बॅटिंग करण्यासाठी अडीच वर्षचं आहेत. त्यामुळे कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे आहेत. अस म्हणत विरोधकांनी डिवचण्याचा प्रयत्न केला. ज्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी थेड मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
राजकीय लालसेपोटी ईडी सरकारकडून चुकीचे धोरण स्वीकारले जात नाही ना अशी शंका महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुजरातच्या हितासाठी ‘बुलेट ट्रेन’ चा निर्णय तत्परतेने घेतात परंतु महाराष्ट्रातल्या अनेक विषयांवर निर्णय होत नाही असा ट्रॅकरेकॉर्ड ईडीसरकारचा आहे असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे, एकीकडे सरकारच्या संविधानिकतेबाबतचा न्यायालयीन खटला, दुसरीकडे नैराश्यग्रस्त बंडखोर आमदार आणि तिसरीकडे ठाकरे गटाला मिळणारा जनप्रतिसाद आणि त्यावर ‘सी वोटर’ चा लोकसभा निवडणुकीबाबत आलेला सर्वे या सर्व बाबींमुळे ईडी सरकार वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये आहे असा जोरदार हल्लाबोलही महेश तपासे यांनी केला. कमी बॉलवर जास्त रन काढण्याच्या नादात असल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिली आहे त्यामुळे विश्वासघाताच्या आधारावर स्थापन झालेल्या शिंदे सरकार जास्त काळ टिकेल असे वाटत नाही असेही महेश तपासे म्हणाले.