पत्नी नांदायला येत नसल्याच्या नैराश्यातून एका दारुड्याने तासगावच्या नागरिकांसह प्रशासनाचा जीव टांगणीला लावला
![Due to the depression of his wife not coming to Nanda, a drunkard hanged the lives of the administration along with the citizens of Tasgaon.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Due-to-the-depression-of-his-wife-not-coming-to-Nanda-a-drunkard-hanged-the-lives-of-the-administration-along-with-the-citizens-of-Tasgaon..jpg)
सांगली: पत्नी नांदायला येत नसल्याच्या नैराश्यातून एका दारुड्याने तासगावच्या नागरिकांसह प्रशासनाचा जीव टांगणीला लावला होता. या पतीने दारू ढोसून थेट विजेच्या खांबावर चढून सुमारे तासभर विजेच्या तारांवर सर्कस करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला खाली उतरवताना पोलीस आणि नागरिकांच्या नाकी नऊ आले होते. अखेर अथक प्रयत्नानंतर मद्यपी तरुणास खाली उतरवले.
तासगाव शहरातील विटा नाका येथे भर रस्त्यातील एका विजेच्या खांबावर मद्यपी पतीचा झिंगाट थरार पहायला मिळाला. प्रशांत माळी नामक तरणाने पत्नी नांदायला येत नसल्याने थेट विजेच्या खांबावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दारूच्या नशेत विजेच्या खांबावर चढू लागला. काही नागरिकांना तात्काळ याची माहिती वीज वितरण विभागाला देताच याठिकाणी असणारा विजेचा पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, मद्यधुंद अवस्थेतील प्रशांत हा विजेच्या खांबावर चढला होता. सुदैवाने वीज पुरवठा बंद केल्याने दुर्घटना टळली. मात्र, विजेच्या खांबावर चढलेल्या प्रशांतची तारेवर कसरत सुरू झाली होती. सुमारे तासाभर प्रशांत हा सर्कशीतील व्यक्तीप्रमाणे विजेच्या खांबावर थरारक कसरत होता.
दारुड्याचा हा प्रताप पाहण्यासाठी याठिकाणी नागरिकांना झुंबड उडाली. त्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला होता. तर प्रशांत त्याची विजेचे खांबावर लटकून सूरु असलेला थरार पाहून नागरिकांच्या आणि प्रशासनाचा जीव मात्र टांगणीला लागला होता. अखेर एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर विजेच्या तारांना लटकणाऱ्या प्रशांतला खाली उतरवण्यात आलं आणि सगळ्यांनीच सुटकेचा श्वास सोडला. या प्रकरणी पोलिसांनी प्रशांत माळीविरोधात कारवाई केली आहे.