‘‘शो-बाजी’’ नको फुलांची आकर्षक झाडे लावा : माजी विरोधी पक्षनेते नाना काटे
महापालिका प्रशासनाला निवेदन : जगताप डेअरी ते शिवार चौक फुटपाथवरील झाडे हटवा
पिंपरी : प्रभाग क्र २८ रहाटणी, पिंपळे सौदागर मधील जगताप डेअरी ते शिवार चौक आणि स्वराज गार्डन चौक ते कोकणे चौक दरम्यान फुटपाथ विकसित करताना लावण्यात आलेली शो ची झाडे काढून त्याजागी १ ते २ फुटापर्यंत वाढणारी फुलांची आकर्षक झाडे लावण्यात यावी अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.
रहाटणी पिंपळे सौदागर येथे जगताप डेअरी ते शिवार चौक, स्वराज गार्डन चौक ते कोकणे चौकापर्यंत महापालिकेतर्फे स्मार्ट सिटी व उद्यान विभागातर्फे फुटपाथ विकसित करताना रस्त्याचा दोन्ही बाजूला शोभेची झाडे लावण्यात आलेली आहेत. मुळात हि झाडे खूप अस्ताव्यस्त ८ ते १० फुटापर्यंत वाढलेली आहेत. यामुळे नागरिकांना फुटपाथ वरून चालताना, व सायकल चालविणाऱ्या नागरिकांना अडथळा ठरत आहेत.
पावसामुळे झाडे मोठ्या प्रमाणत वाढल्याने याचा आधार घेत रात्रीच्या वेळी येथे अनुचित प्रकार घडत असतात. याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी येत असून काही अनुचित प्रकार व दुर्घटना घडू नयेत. यासाठी फुटपाथ लगत विकसित करताना लावण्यात आलेली झाडे त्वरित काढून त्याजागी १ ते २ फुटांपर्यंत वाढणारी फुलांची व शोभेची आकर्षक झाडे लावण्यात यावी असे नाना काटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.