ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईतील ३० ते ३२ माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल होण्याची चर्चा
![Discussion of 30 to 32 former corporators from Navi Mumbai joining Shinde group after Thane](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Discussion-of-30-to-32-former-corporators-from-Navi-Mumbai-joining-Shinde-group-after-Thane.jpg)
नवी मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला आणखी एक दणका दिला आहे. ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईतील ३० ते ३२ माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल होण्याची चर्चा आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतत ३७ नगरसेवक आहेत त्यापैकी ३० ते ३२ नगरसेवक आज शिंदे गटात दाखल होण्याची शक्यता आहे.
ठाणे महानगरपालिकेतील ६७ नगरसेवकांपैकी तब्बल ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. गुरुवारी या सर्व नगरसेवकांवी शिंदे गटात प्रवेश करत शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईतदेखील शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. यानंतर शिवसेनेचे ३० ते ३२ माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेच्या ६६ माजी नगरसेवकांनी बुधवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी जाऊन शिंदे यांना पाठिंबा देऊन शक्तिप्रदर्शन केले. माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली या सर्वांनी एकनाथ शिंदे यांच्या निर्णयास समर्थन दिले. ‘कुठेही गेलात तरी आम्ही तुमच्या सोबत राहणार’ असा विश्वास नगरसेवकांकडून देण्यात आला. ठाणे महापालिकेमध्ये २०१७ च्या निवडणुकीमध्ये ६७ नगरसेवक निवडून आले असून, त्यापैकी ६६ नगरसेवक शिंदे गटात आले आहेत.
नवी मुंबईत शिवसेनेचे दोन गट
शिवसेनेतील शिंदे गटाच्या बंडाचे पडसाद नवी मुंबईत उमटू आहेत. बेलापूर मतदारसंघाची धुरा सांभाळणारे विजय नाहाटा आणि ऐरोली मतदारसंघाची धुरा सांभाळणारे विजय चौगुले यांनी उद्धव ठाकरेंचे शिवबंधन तोडून एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले आहे. त्यांच्या सोबत इतर काही नगरसेवकांचाही यात सहभाग आहे. नवी मुंबईतील दिग्गज नेते मातोश्रीची साथ सोडून शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यांच्यावर येत्या काही दिवसांत कारवाई केली जाणार असल्याचे संकेत आहेत. त्यांची शिवसेनेतील पदेही काढून घेतली जाणार आहेत. या बाबतचा अहवालही मातोश्रीवर पाठवण्यात आला आहे. यामध्ये बेलापूर मतदारसंघाचे मुख्य विजय नाहाटा, ऐरोलीतील शहर प्रमुख विजय चौगुले, कोपरखैरणेमधील माजी नगरसेवक शिवराम पाटील, विलास भोईर, किशोर पाटकर, ऐरोलीतील माजी नगरसेवक जगदीश गवते यांचा प्रामुख्याने समावेश आहे.