भक्तांना घेता येणार अयोध्येतील राम लल्लाचं दर्शन; तारीख आली समोर
![Devotees can visit Ram Lalla in Ayodhya; The date came up front](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/Devotees-can-visit-Ram-Lalla-in-Ayodhya-The-date-came-up-front.jpg)
नाशिकः सन् २०२४ च्या फेब्रुवारी महिन्यात रामलल्लांची मूर्ती नूतन गर्भगृहात स्थापन केली जाईल, असा विश्वास श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विकास योजनेचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी व्यक्त केला. या स्थापनेनंतरही मंदिराचे काम सुरूच राहील व भाविकांसाठी दर्शनाची व्यवस्था होईल, असेही त्यांनी सांगितले.पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात दर्शनप्रसंगी ते बोलत होते. नेत्यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत ते म्हणाले, अयोध्येचा राम सर्वांचा असला तरीही त्याचा उपयोग राजकीय हेतूसाठी केला जाऊ नये. रामाच्या दर्शनासाठी कुणालाही प्रतिबंध असता कामा नये. याशिवाय ज्ञानवापीमधील तपास आणि ताजमहालासंदर्भात भाष्य करताना त्यांनी या ठिकाणी पूर्वी मंदिर असल्याचे म्हटले.
समान नागरी कायद्यास त्यांनी समर्थन दर्शविले. बुधवारी सकाळी त्यांनी ग्रामदैवत भद्रकाली मंदिरात दर्शन घेतले. तीळभांडेश्वर लेन येथे सोमेश्वर मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. सायंकाळी श्रीगुरूजी रुग्णालयातील सेवा सदन प्रकल्पाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. जयंतराव गायधनी यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट देऊन प्राचीन हस्तलिखितांचे अवलोकनही केले. रात्री अंजनेरी येथील श्रीमद्भागवत कथासृष्टी शिलान्यास सोहळ्यात उपस्थित राहिले.