Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

करोनाकाळामुळे अनेक क्षेत्रांत पायाभूत सुधारणा, विकासाचा वेग वाढणार : विनीत जैन

मुंबई : ‘करोनाकाळामुळे अनेक क्षेत्रांत पायाभूत सुधारणा घडून आल्या आणि त्याचा परिणाम विकासाचा वेग वाढण्यात झाल्याशिवाय राहणार नाही,’ असे प्रतिपादन टाइम्स समूहाचे व्यवस्थापकीय संचालक विनीत जैन यांनी रविवारी येथे केले. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘सुमारे दोन वर्षांच्या कालखंडाने आपल्या सर्वांचे येथे स्वागत करताना मला आनंद होत आहे. अगदी छोट्या किराणा दुकानदारापासून ते बड्या वाहनउत्पादकापर्यंत सर्वांचीच गेल्या दोन वर्षांनी कसोटी बघितली. मात्र, आज आपण प्रत्यक्ष भेटत आहोत, तेव्हा भारताचा जीडीपी विकासदर पुन्हा रुळांवर आला आहे. शेअर बाजार गेल्या वर्षी २० टक्क्यांनी वधारला. देशातील उद्योग क्षेत्र शिकले, सावरले आणि आता पुन्हा पूर्वीच्याच जोमाने कार्यरत झाले आहे. एप्रिलमध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक जीएसटी करसंकलन झाले आहे, यावरून हेच सिद्ध होते. भारतातील उद्योग क्षेत्राचा बदलता चेहरा ‘ईटी’ पुरस्कारांमधून कायमच प्रतिबिंबित होत आला आहे. या वर्षीचे विजेतेही त्याचेच उत्कृष्ट उदाहरण आहेत. या दोन वर्षांत आरोग्य हा देशासमोरचा सर्वांत मोठा चिंतेचा विषय असताना, यंदाचे चार विजेते आरोग्य आणि औषधनिर्माण क्षेत्राचे प्रतिनिधी आहेत. तंत्रज्ञानाचे महत्त्वही याच काळात आपल्याला समजले. याच क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे आणखी तीन विजेते यंदा आहेत. या विजेत्यांच्या यशाचे काही श्रेय हे नक्कीच यंदाच्या ‘बिझनेस रिफॉर्मर ऑफ दी इयर’ पुरस्काराच्या विजेत्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना जाते.’

‘करोनाकाळामुळे अनेक क्षेत्रांत पायाभूत सुधारणा घडून आल्या आणि त्याचा परिणाम विकासाचा वेग वाढण्यात झाल्याशिवाय राहणार नाही. जीएसटीच्या अंमलबजावणीत निश्चित सुधारणा होत आहे. करांचे सुसूत्रीकरणही विचाराधीन आहे. कंपनी कायदा व्यवसायाला उत्तेजन देणारा हवा, तसा तो आता झाला आहे. या कायद्यातील बऱ्याचशा तरतुदींत सुधारणा करण्यात आली आहे. दिवाळखोरीचा कायदाही सुधारणेच्या मार्गावर आहे. त्यामुळे बँकाही त्यांच्या ‘एनपीए’च्या संकटातून बाहेर आल्या आहेत. विकासासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी बँका आता पुन्हा सज्ज झाल्या आहेत. करोनाकाळात मागणी कमी झाली, तेव्हा सरकारी खर्चामुळे अर्थव्यवस्थेला मदत झाली. देशाचा अर्थसंकल्पही आता अधिक पारदर्शक झाला आहे. खासगीकरणाला पुन्हा वेग आला आहे. ‘एअर इंडिया’चे पुन्हा खासगीकरण होईल, असे कुणालाही वाटत नव्हते; मात्र तिची विक्री झाली. ‘पवनहंस’चीही काही काळापूर्वी विक्री झाली. आता ‘एलआयसी’चा आयपीओही खुला झाला आहे. सरकारची विकासाची आस्था यातून दिसून येते. आणखी मोठी सुधारणा, म्हणजे संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांत खासगी कंपन्यांचा सहभाग. जगातील अस्थिर आर्थिक, राजकीय परस्थिती पाहता, संरक्षण व इतर क्षेत्रांत ‘आत्मनिर्भर’ होण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचे महत्त्व लक्षात येईल,’ असे जैन म्हणाले.

‘अर्थव्यवस्थेनेही या उपाययोजनांना प्रतिसाद दिला आहे. गेल्या आर्थिक वर्षात विकासदर वाढून ८.९ टक्के झाला आणि यंदाही तो ८ टक्के राहण्याची शक्यता आहे,’ असे सांगून विनीत जैन म्हणाले, ‘या उपाययोजनांमुळे आपण जगासमोर उभ्या राहणाऱ्या नव्या आव्हानांना तोंड देण्यात सक्षम होऊ. हे आव्हान आहे अस्थिर भू-राजकीय स्थितीचे आणि युद्धाचे! पुन्हा एकदा देश आणि जगापुढे चलनवाढ, वस्तूंची टंचाई आणि विस्कळित पुरवठा साखळीचे संकट उभे आहे. भारतातील धोरणकर्ते आणि उद्योग क्षेत्राने कोव्हिडच्या संकटाला दमदारपणे तोंड दिले आहे आणि मला विश्वास आहे, की एकत्र काम करून आपण या नव्या आव्हानांवरही मात करू शकू. ‘ईटी पुरस्कार’ सोहळ्यात आपण यश साजरे करतो, पण त्याबरोबरच प्रेरणास्रोत आणि सातत्यपूर्ण गुणवत्ताप्रधान काम यांनाही महत्त्व आहे. सगळे मिळून गुणवत्तेचा गौरव करू या.’

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button