सत्तासंघर्षाच्या खेळात करोनाची एन्ट्री, उद्धव ठाकरेंना करोनाची बाधा
![Corona's entry in the game of power struggle, Corona's obstacle to Uddhav Thackeray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/Coronas-entry-in-the-game-of-power-struggle-Coronas-obstacle-to-Uddhav-Thackeray.jpg)
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेसाठी संघर्षाचा काळ सुरु असताना ठाकरेंसमोरचं संकट काही केल्या संपत नाहीये. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज सकाळी कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलेलं असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येतीय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे यांना जरी कोरोनाची लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती ठीक आहे. काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याशी त्यांचं बोलणं झालं आहे, अशी माहितीही नाना पटोले यांनी दिली.
नाना पटोले काय म्हणाले?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज सकाळी कोरोनाची लागण झाली आहेत. त्यांनी आताच कमलनाथ यांच्याशी चर्चा केली. आज दुपारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते व्हर्च्युअली सहभागी होतील. विधानसभा बरखास्तीचा कोणताही विचार नाही, पूर्ण ताकदीने सरकार चालवणार, असं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं, अशी माहितीही नाना पटोले यांनी दिली.
राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. राज्यपालांना रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यपाल कोश्यारींना ताप येत होता. खबरदारी म्हणून त्यांची करोना चाचणी करण्यात आली. त्या चाचणीचे आज अहवाल आले असून त्यांना करोना झाल्याचं निदान झालं आहे. त्यामुळं आज सकाळीच राज्यपाल कोश्यारींना रिलायन्स रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.