प्रतीक्षानगरपाठोपाठ सांताक्रूझ आगारही कंत्राटदाराला आंदण?
![CST is not profitable, until recruitment is stopped; Decision of the corporation announced; Candidates on the waiting list also have no chanceommencement of various development works in Nigdi Cemetery; The inconvenience to the citizens will be avoided](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/mv3-best.jpg)
मुंबई | भाडेतत्वावर बसचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला त्यांची देखभाव व दुरुस्तीसाठी बेस्ट आगार आंदण देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रतीक्षानगर आगाराची जागा प्रतिबस एक रुपया दराने वार्षिक भाडे आकारून कंत्राटदाराला देण्यात येत असून त्याच सूत्रानुसार आता सांताक्रूझ आगाराची जागाही कंत्राटदाराच्या हवाली करण्याचा घाट घालण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांमध्ये या प्रकारामुळे प्रचंड असंतोष निर्माण झाला असून याविरोधात बेस्ट संयुक्त कामगार कृती समिती आक्रमक भूमिका घेण्याच्या पवित्र्यात आहे. बेस्ट खासगीकरणाच्या दिशेने एकेक पाऊल टाकत असल्याचा आरोप करीत कृती समितीने २ मोर्च रोजी वडाळा आगारात निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे.
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात एकूण ३,४६० बस असून त्यात स्वमालकीच्या १,९०६, तर भाडेतत्त्वावरील १,५५४ बसचा समावेश आहे. येत्या काही वर्षांत भाडेतत्त्वावरील बसची संख्या आणखी वाढविण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला आहे. भाडेतत्त्वावरील बसचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांना बस उभ्या करणे, त्यांची देखभाल, दुरुस्तीसाठी बस आगारातील जागा प्रतिबस एक रुपया वार्षिक भाडे आकारुन देण्याचा घाट बेस्ट उपक्रमाने घातला आहे. प्रतीक्षानगर आगार कंत्राटदाराच्या हवाली करण्यात आले असून आता सांताक्रूझ बस आगारही कंत्राटदाराला देण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे कृती समितीचे पदाधिकारी शशांक राव यांनी सांगितले.
उपक्रमाच्या मालकीच्या ३.३३७ बस ताफ्यात समाविष्ट करण्याचे आश्वासन उपक्रमाने करारात दिले होते. त्याला मूठमाती देऊन खासगी गाडय़ा ताफ्यात समाविष्ट करण्यात येत असल्याचा आरोप राव यांनी केला. सांताक्रूझ आगाराबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या या आगारातून पूर्वीप्रमाणेच बस सेवा सुरू आहे, असे बेस्ट उपक्रमाचे उपजनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी स्पष्ट केले. मात्र प्रशासन बसपुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांना आगाराची जाग नाममात्र भाडे आकारून देत असल्याच्या निर्णयाविरोधात २ मार्चला दुपारी दोन वाजता वडाळा आगारात निदर्शने करण्यात येणार असल्याचे शशांक राव यांनी सांगितले.