उद्धव ठाकरेंविरोधात बंडखोरी करणाऱ्या बच्चू कडूंना क्लीन चिट; काय आहे प्रकरण?
![Clean chit to Bachchu Kadu who rebelled against Uddhav Thackeray; What's the matter?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/Clean-chit-to-Bachchu-Kadu-who-rebelled-against-Uddhav-Thackeray-Whats-the-matter.jpg)
अकोला : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या अनेक आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे सरकार अल्पमतात आलं होतं. या बंडखोर आमदारांमध्ये बच्चू कडू यांचाही सहभाग आहे. दरम्यान, बच्चू कडू यांना एका गैरव्यवहार प्रकरणी अकोल्यात क्लीन चिट देण्यात आली आहे.
बच्चू कडूंना रस्ते घोटाळ्यात क्लीन चिट…
राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांना तीन रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणातून क्लीन चिट मिळाली आहे. अस्तित्वात नसलेल्या तीन रस्त्यांच्या कामात तब्बल एक कोटी ९५ लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. वंचित बहुजन आघाडीच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर हे आरोप झाले होते. हे प्रकरण कोर्टात दाखल करण्यात आलं होतं. न्यायालयाच्या आदेशानंतर सिटी कोतवाली पोलिसांत बच्चू कडू यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. संपूर्ण प्रकरणात पुरावे नसल्यानं प्रकरणच तथ्यहिन असल्याचं कोतवाली पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. या प्रकरणाची फाइल आता अकोला पोलिसांनी बंद केली.
काय होते नेमके आरोप?
अकोल्यातील जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करून पालकमंत्री बच्चू कडूंनी कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता. दरम्यान, जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या १३ कामांना स्थगिती दिल्याने पालकमंत्री कडू यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची मागणी वंचितने केली आहे. यासंदर्भात प्रकाश आंबेडकरांनी ७ फेब्रुवारीला कारवाईच्या परवानगीच्या मागणीसाठी राज्यपालांची भेट घेतली होती. राज्यपालांच्या पत्रात यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीनं बच्चू कडू यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली. सोबतचं प्रथमश्रेणी न्यायालयाने कलम १५६ (३) नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश बजावले. वंचित बहुजन आघाडीने यासंदर्भात न्यायालयात अर्जही केला होता. हा अर्ज न्यायालयाने मंजूर करून थेट सिटी कोतवाली पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसासर कडूंवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते.
कुठल्या कामात अपहार झाल्याचा आरोप
१) गायगाव ते रिधोरा रस्त्याला जोडणारा लहान पुल आणि पोचमार्गाच्या कामात ५० लाखांच्या अपहाराचा आरोप
२) इतर जिल्हा मार्गाला (इजिमा) जोडणाऱ्या धामना ते नवीन धामना जोड रस्ता सुधारणेच्या कामात २० लाखांच्या अपहाराचा आरोप
३) कुटासा ते पिंपळोद मार्गाला जिल्हा मार्ग मार्ग दाखवत यासाठी निधी वळता करीत १ कोटी २५ लाखांच्या अपहाराचा आरोप
बच्चू कडूंनी फेटाळले आरोप
वंचितनं यासंदर्भात सर्वात आधी आरोप केल्यानंतर बच्चू कडू यांनी आर्थिक अनियमिततेचे आरोप फेटाळले होते. यासंदर्भात वंचितकडून तांत्रिक बाबींचा आधार घेत गैरसमज पसरवला जात असल्याचं राज्यमंत्री कडू म्हणाले होते. दरम्यान, यासंदर्भात आपले राजकीय मित्र असलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षानं हे आरोप केल्याचं दुःख आहे, असे राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले होते.