निष्ठावान शिवसैनिकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटले
![Chief Minister Eknath Shinde met loyal Shiv Sainiks](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Chief-Minister-Eknath-Shinde-met-loyal-Shiv-Sainiks.jpg)
मुंबई :लीलाधर डाके, मनोहर जोशी तर अनेक कठीण प्रसंगात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे राहिले आहेत. डाके, जोशी यांच्याकडून या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. अशा कडवट, निष्ठावान शिवसैनिकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटले ही चांगली गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. एकनाथ शिंदेंनी जोशी-डाके यासारख्या शिवसेना नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या होत्या.
राज्याचे मुख्यमंत्री कोणाला भेटत असतील तर स्वागतच केले जाईल. ती आपली परंपरा आहे. लीलाधर डाके, मनोहर जोशी तर अनेक कठीण प्रसंगात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले आहेत. डाके, जोशी यांच्याकडून या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. ते वादळात-संकटात ते शिवसेनेसोबत निष्ठेने उभे राहिले. अशा कडवट, निष्ठावान शिवसैनिकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटले ही चांगली गोष्ट आहे, नक्कीच त्यांना प्रेरणा आणि बोध मिळेल, असं राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे कोणत्या पक्षाच्या नियुक्त्या करत आहेत? त्यांना काय अधिकार आहे? पोरखेळ चालू आहे. आम्ही याला गांभीर्याने घेत नाही, यांचा संबंध काय, बाळासाहेबांनी वाढवलेल्या वृक्षात मोठे झाले, सावली घेतली, फळं खाल्ली, तुम्ही बाजूला झालेले आहात, तर तुमचा स्वतःचा पक्ष स्थापन करा आणि नियुक्त्या करा, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.
दिल्लीच्या वाऱ्या-फेऱ्या सुरू आहेत अजून मंत्रिमंडळाची स्थापना झाली नाही. यातून वेळ काढत मुख्यमंत्री महाराष्ट्र फिरत असतील तर त्यावर टीका करण्याचे कारण नाही. मंत्रिमंडळ विस्तार का रखडला, हे हम दो और हमारे दो सांगू शकतात. राज्यात सत्तांतर होईल या माझ्या मताशी मी ठाम आहे,
ठीक आहे कोणाला हे स्वप्न वाटत असेल, पण माझं स्वप्न आहे. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, मिळेल त्या मार्गाने मुख्यमंत्री व्हायचं. आम्हाला महाराष्ट्रात सत्ता आणायची आहे, मात्र मिळेल त्या मार्गाने नाही. लोकांमध्ये जाऊन लोकशाही मार्गाने आम्हाला सत्ता आणायची आहे. ती वेळ लवकरच येईल, असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केला.
राजकीय दबावापोटी मला ईडीच्या नोटीसा आल्या, पुन्हा समन्स आल्यावर पाहू, माझा आवाज बंद करण्यासाठी हे सगळं सुरू आहे, पण संजय राऊत काय आहे हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांना माहित आहे. शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेने सोबतच राहणार गुडघे टेकणार नाही कितीही दबाव आला तरी, असं राऊतांनी ठणकावून सांगितलं.