पुणे महापालिकेतील ४४८ जागांसाठी २० जुलै ते १० ऑगस्ट या दरम्यान उमेदवारांना अर्ज करता येणार ; कधी व कसा करता येणार अर्ज, जाणून घ्या
![Candidates can apply for 448 seats in Pune Municipal Corporation from July 20 to August 10; Know when and how to applyCandidates can apply for 448 seats in Pune Municipal Corporation from July 20 to August 10; Know when and how to apply](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Candidates-can-apply-for-448-seats-in-Pune-Municipal-Corporation-from-July-20-to-August-10-Know-when-and-how-to-apply.jpg)
पुणेः पुणे महापालिकेतील बहुचर्चित नोकरभरतीची जाहिरात बुधवारी प्रसिद्ध झाली असून, ४४८ जागांसाठी २० जुलै ते १० ऑगस्ट या दरम्यान उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. सहायक विधी अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता आणि अतिक्रमण निरीक्षक या पदांसाठी ही भरती असून, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत या भरतीसंदर्भात परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिली.
दहा वर्षांपासून भरतीच नाही
पुणे महापालिकेत गेल्या १० वर्षांहून अधिक काळ पदभरती झालेली नाही. महापालिकेत ‘वर्ग एक’ ते ‘वर्ग चार’पर्यंतच्या सुमारे ११ हजार जागा रिक्त आहेत. अपुऱ्या मनुष्यबळावर कारभार सुरू असल्याने त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. कंत्राटी कामगारांचे प्रमाण वाढले असून, त्यावरील खर्चही वाढला आहे. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या कायम सेवा भरतीवरील बंदी उठविल्याने अत्यावश्यक पदभरती पहिल्या टप्प्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेत कनिष्ठ अभियंता आणि लिपिकांची संख्या कमी आहे. सहायक अतिक्रमण निरीक्षक, सहायक विधी अधिकारी यांचीही भरती केली जाणार आहे.
पारदर्शी भरती प्रक्रिया
भरतीप्रक्रिया पारदर्शी असावी, यासाठी महापालिकेने केंद्र सरकारच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन’ (आयबीपीएस) या संस्थेद्वारे परीक्षा घेण्यासाठी करार केला आहे. पदभरतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची शक्यता गृहित धरून ही परीक्षा केवळ पुण्यात घेणे अशक्य आहे. त्यामुळे मुंबई, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर यासह अन्य शहरांमध्येही घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. पुणे महापालिकेतील या भरतीत गैरप्रकार घडू नयेत आणि गुणवत्तापूर्ण कर्मचारी निवडले जावेत, यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन’ (आयबीपीएस) या संस्थेकडून भरती केली जाणार आहे. या परीक्षा ऑनलाइन होणार आहेत.
येथे मिळेल माहिती
महापालिकेच्या https://www.pmc.gov.in/en/recruitments या लिंकवर १० ऑगस्टपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज भरता येणार आहे. भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व माहिती महापालिकेच्या बेवसाइटवर या लिंकवर उपलब्ध असून, भविष्यातील सूचनाही या ठिकाणीच अपलोड करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
भरतीप्रक्रियेची वैशिष्ट्ये
– कनिष्ठ अभियंता, लिपिक, सहायक अतिक्रमण निरीक्षक, सहायक विधी अधिकारी, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची निवड होणार.
– पाचशेहून अधिक जागा भरणार. कनिष्ठ अभियंता आणि लिपिकांना अधिक प्राधान्य.
– भरतीप्रक्रियेसाठी केंद्र सरकारच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन’ची मदत घेणार.
– पुण्यासह मुंबई, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर या शहरांमध्येही प्रक्रिया राबवणार.
– ऑनलाइन परीक्षेवर भर.
पद पदांची संख्या
सहायक विधी अधिकारी (श्रेणी ३) ०४
लिपिक टंकलेखक (श्रेणी ३) २००
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी ३) १३५
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी ३) ०५
कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) (श्रेणी ३) ०४
सहायक अतिक्रमण निरीक्षक (श्रेणी ३) १००
भरतीचे वेळापत्रक
तपशील दिनांक
अर्ज नोंदणी सुरू (ऑनलाइन) २० जुलै
अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक १० ऑगस्ट
परीक्षा शुल्क भरणे अंतिम दिनांक २० जुलै ते १० ऑगस्ट
परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध होणार परीक्षेच्या सात दिवस आधी
ऑनलाइन परीक्षेचा दिनांक ऑगस्ट, सप्टेंबर (संभाव्य)