जळगावमध्ये राऊत यांच्या पुतळ्याचे दहन, गुलाबराव पाटील समर्थक आक्रमक
![Burning of Raut's statue in Jalgaon, Gulabrao Patil supporters aggressive](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/गुलाबराव-पाटील-यांच्यावरील-टीकेमुळे-समर्थक-भडकले-संजय-राऊतांच्या-पुतळ्याचं-दहन.jpg)
जळगाव : शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांच्या गोटात दाखल झाल्याने मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी आक्रमक टीका केली. या टीकेनंतर राऊत यांच्याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांमध्ये चांगलाच रोष पाहायला मिळत आहे. पाटील यांच्या पाळधी गावात संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आलं आहे. यावेळी गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांच्या बंडखोरीमुळे आधीच शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष पेटला असताना, दुसरीकडे संजय राऊत यांनी बंडखोरांवर केलेल्या टीकेमुळे बंडखोर नेत्यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पानटपरीवर बसणाऱ्या गुलाबराव पाटील यांना मंत्री केले, आता त्यांना पुन्हा पानटपरीवर बसवू, अशा शब्दांत राऊत यांनी टीका केली होती. यावरुन गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी पाळधीत राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले. तसंच संजय राऊत मुर्दाबाद अशा घोषणाही दिल्या.
‘संजय राऊत मागच्या दाराने खासदार झाले’
‘सामान्य कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्रिपद अशी गुलाबराव पाटील यांची शिवसेनेतील वाटचाल आहे. पाटील हे चार वेळा विधानसभेचे आमदार झाले आहेत. मात्र संजय राऊत हे मागच्या दाराने खासदार झाले आहेत. त्यामुळे चार वेळा लोकांमधून निवडून आलेल्या गुलाबराव पाटील यांच्यावर बोलण्याचा राऊतांना काय अधिकार आहे? राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करुन शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या. ज्यांना गद्दार म्हणत आहेत, त्यांच्याच जिवावर निवडून आलेल्या राऊत यांनी नैतिकता दाखवत राजीनामा द्यावा,’ असंही यावेळी गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी म्हटलं आहे.