Bhandara Hospital Fire: पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत; राजेश टोपेंची माहिती
![Health minister Rajesh Tope declares 5 lac ruppes compensation to the families of Bhandara hospital fire victims from CM Fund](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/images_1586428595722_rajesh_tope.jpg)
महाराष्ट्रातील भंडारा येथे घडलेल्या घटनेमुळे देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) मध्यरात्री आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला तर सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
राज्य सरकारकडून दुर्घटनेतील पिडीत कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून, यात कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील राजेश टोपे यांनी सांगितले.
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनीटचे तातडीने ऑडीट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.