कोकणच्या विकासासाठी एमएमआरडीएच्या धर्तीवर प्राधिकरण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![Authority on lines of MMRDA for development of Konkan: Chief Minister Eknath Shinde](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Eknath-Shinde-3.png)
रत्नागिरी : कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. कोकणातील जिल्ह्यांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन व विकास करण्याचे काम हे प्राधिकरण करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत, बंदरे विकास मंत्री दादा भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर तसेच आमदार व माजी आमदार आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मत्स्य व्यवसाय धोरणाबाबत प्रयत्न केले जातील. मत्स्य व्यवसायातून परकीय चलन कसे उपलब्ध होईल यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. तामिळनाडू आणि गुजरातच्या मत्स्य व्यवसाय धोरणाबाबत अभ्यास करून त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येईल.
अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न
कोकण विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील. राज्यासह कोकणातील गड- किल्ल्यांच्या विकास संवर्धनाबाबत निर्णय घेतले जातील. केरळप्रमाणे बॅक वॉटरमध्ये पर्यटन वाढीसाठी बांधा आणि वापरा तत्त्वावर विविध सेवासुविधा पुरवल्या जातील. कोकणातील साकव, विम्यातील त्रुटी, किनारा विकासासाठी प्रयत्न, सिंचनाच्या सुविधा याबाबत प्रयत्न केले जातील. औरंगाबाद-पुणे मार्गाच्या धर्तीवर मुंबई ते सिंधुदुर्ग हा मार्ग एक्सेस कंट्रोल मार्ग करता येईल का, याबाबतही अभ्यास करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
रत्नागिरी येथील विमानतळ विकासाच्या कामाला गती देण्यात आली असून यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणातर्फे 77.7 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. गतिमान विकासासाठी आवश्यक ते भूसंपादन करण्याचे काम सुरू आहे, असेही जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी आपल्या सादरीकरणात सांगितले.