मुसळधार पावसामुळं दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
![An unfortunate death of a student studying in class 10 due to heavy rain](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/An-unfortunate-death-of-a-student-studying-in-class-10-due-to-heavy-rain.jpg)
विरारः गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भातही अनेक नद्यांना पूर आल्यामुळं जिवीतहानी झाली आहे. तर, मुंबईतही पावसाची संततधार कायम आहे. मुंबई लगतच्या वसई- विरार परिसरातही मुसळधार पाऊस आहे. याच मुसळधार पावसामुळं दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
विरारमध्ये दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीसोबत भयंकर प्रकार घडला आहे. ट्युशनवरुन घरी परतत येत असतानाच या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळं तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तनिष्का लक्ष्मण कांबळे (वय १५) असं मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
तनिष्का कांबळे ही विरार पश्चिमेकडील बोळींज परिसरात राहते. घराच्या परिसरातच ती ट्युशनसाठी जाते. मात्र, त्यादिवशी ती ट्युशनला गेली ती परत आलीच नाही. दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळं सोसायटीच्या परिसरात पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यात वीजेची तार तुटून पडली होती. या तुटलेल्या तारेतून विजेचा प्रवाह चालू होता. त्याच पाण्यातून जाताना तनिष्काला विजेचा शॉक लागला आणि तिचा मृत्यू झाला आहे.
तनिष्काच्या मृत्यूमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर, एमएसीबीच्या निष्काळजीपणामुळं तनिष्कावर हा जीवघेणा प्रसंग ओढावल्याचा आरोपही होत आहे. दहावीत शिकणाऱ्या तनिष्काच्या मृत्यूमुळं तिच्या कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे. दुर्दैव म्हणजे, हा सगळा प्रकार तिच्या घराखालीच घडला आहे. घर अवघ्या दहा पावलांवर असतानाच तनिष्कासोबत हा भयंकर प्रकार घडला आहे.
दरम्यान, दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा बॅटिंग सुरू केली आहे. नालासोपारा, वसई, विरार परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाने हाच जोर कायम ठेवला तर परिसर जलमय होण्याची भीती आहे.