Uncategorizedताज्या घडामोडीपुणेराजकारण

अमोल कोल्हें मारक की आढळराव तारक

शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीच्या तुलनेत ५.२८ टक्क्यांनी घटलेले मतदान कोणाच्या फायद्याचे किंवा कोणाच्या तोट्याचे याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. या निवडणुकीत ५४.१६ टक्के मतदान झाले आहे. २०१९ च्या निवडणुकीत ५९.४४ टक्के मतदान झाले होते. घटलेले मतदान विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना तारणार, की प्रतिस्पर्धी शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार करून संसदेत पाठवणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, भोसरी आणि हडपसर या सहा विधानसभा मतदारसंघात मिळून २५ लाख ३९ हजार ७०२ मतदारांपैकी १३ लाख ७५ हजार ५९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ७ लाख ७३ हजार ९६९ पुरुष मतदारांनी तसेच सहा लाख एक हजार ५९१ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ३३ पारलिंगी व्यक्तींनी मतदान केले.

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी कमी असली, तरी प्रत्यक्ष मतदान ८३ हजार २१२ने वाढले आहे. मागील निवडणुकीत १२ लाख ९२ हजार ३८१ जणांनी मतदान केले होते. यंदा १३ लाख ७५ हजार ५९३ जणांनी मतदान केले. मतदानातील टक्केवारीनुसार सर्वाधिक ६२.९५ टक्के मतदान आंबेगाव विधानसभा मतदारसंघात झाले. त्याखालोखाल जुन्नरमध्ये ५८.१६ टक्के, खेड-आळंदीमध्ये ५७.७६ टक्के, शिरूरमध्ये ५६.९१ टक्के, भोसरीत ४९.४१ टक्के आणि सर्वांत कमी मतदान हडपसर विधानसभा मतदारसंघात ४७.७१ टक्के झाले.

दुसरीकडे मतदारांच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक मतदान हडपसरमध्येच झाले असून, ते दोन लाख ७७ हजार ६४५ इतके आहे. त्या खालोखाल भोसरीमध्ये दोन लाख ७२ हजार ५३९ मतदारांनी मतदान केले. हडपसर आणि भोसरीतील शहरी पट्टा; तसेच आंबेगाव या बालेकिल्ल्यात एक लाख ९० हजार १७९ मतदानातून आढळराव यांना मताधिक्य मिळाल्यास वेगळा निकाल लागू शकतो. मात्र, जुन्नरमध्ये एक लाख, ८१ हजार, ५८४, खेड-आळंदी दोन लाख तीन हजार ६७०, शिरूर दोन लाख ४९ हजार ९७६, या तीन मतदारसंघातील या झालेल्या मतदानातून चांगले मताधिक्य मिळाल्यास आणि आंबेगाव, भोसरी आणि हडपसर येथील काही पट्ट्यांतही तुतारी वाजली, तर कोल्हे यांना चांगले मताधिक्य मिळू शकते, असे जाणकार सांगतात. मागील निवडणुकीत कोल्हे यांनी आढळराव यांचा ५८ हजार ४८३ मतांनी पराभव केला होता. यंदाच्या निकालाताही जय-पराजयात इतकाच फरक राहील, असा अंदाज असल्याने कमालीची चुरस निर्माण झाली आहे.

आमदार कोणाच्या बाजूला?
शिरूरचे आमदार अशोक पवार शरद पवारांसोबत आहेत. आंबेगावचे आमदार आणि मंत्री दिलीप वळसे पाटील, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, खेडचे आमदार दिलीप मोहिते आणि हडपसरचे आमदार चेतन तुपे असे चार आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. हे चार आमदार आणि भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे असा विचार करता कागदावर महायुतीचे पारडे जड असले, तरी महायुती आणि महाविकास आघाडीच्या राजकीय लढाईत कोणी कोणासाठी काम केले किंवा कोण विरोधात गेले, यावर बरीच गणिते अवलंबून आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button