मोरवाडी, शाहूनगर, संभाजीनगर, आकुर्डी व काळभोरनगरचा सर्वांगीण विकास करणार : आमदार अमित गोरखे
मिशन- PCMC : नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत विकासाचा वेग वाढवणार

पिंपरी-चिंचवड : प्रभाग क्रमांक १० आणि १४ मधील विविध भागांमध्ये उमेदवारांच्या वतीने कोपरा सभा व गाठी-भेटींचे आयोजन करण्यात आले होते. शाहूनगर, संभाजीनगर, मोरवाडी, आकुर्डी व काळभोरनगर परिसरात झालेल्या या प्रचारादरम्यान आमदार अमित गोरखे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत परिसरातील प्रलंबित प्रश्नांवर आपली ठोस भूमिका मांडली.
शाहूनगर व संभाजीनगर हे विकासाचे ‘रोल मॉडेल’ भाग असतानाही पाणी, वीज तसेच अनेक सोसायट्यांचे Completion Certificate रखडले असल्याकडे आमदार गोरखे यांनी लक्ष वेधले. रहिवासी सोसायट्यांच्या आसपास असलेल्या वाईन शॉप्समुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने ठोस निर्णय घेऊन हे प्रश्न मार्गी लावले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रचारादरम्यान झालेल्या कोपरा सभांमध्ये बोलताना, ज्या भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास आहे तेथे सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शेल्टर उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच रखडलेले SRA प्रकल्प पूर्ण करून गोर-गरीब जनतेचा कायमस्वरूपी निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. म्हाडा-मोरवाडीतील रखडलेला भुईवाड्याचा प्रश्न तसेच काळभोरनगर व मोहननगर परिसरातील वीजपुरवठ्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीच्या व्हिजनची माहिती देताना आमदार गोरखे म्हणाले की, तरुण, उद्योजक, MSME, स्टार्टअप्स व स्थानिक उद्योगांना चालना देणे, गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे, औद्योगिक पायाभूत सुविधा विकसित करणे आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करणे हे भाजपचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यामुळे शहर व राज्याची अर्थव्यवस्था अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा निवडणुकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश
कला-संस्कृतीचे जतन, क्रीडा सुविधा, युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, धार्मिक-सामाजिक सौहार्द व सामुदायिक ऐक्य मजबूत करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी नागरिकांसमोर मांडली.
मोरवाडी, म्हाडा व लालटोपीनगर परिसरातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर आमदार गोरखे यांनी सविस्तर भूमिका मांडली. मोरवाडीतील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विनाकारण वाढवलेले फुटपाथ कमी करून वाहतूक सुरळीत करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. मुलांसाठी सुरक्षित खेळाचे मैदान, महिलांसाठी सुरक्षित वातावरणासाठी पोलिस गस्त वाढवणे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
याशिवाय, मोरवाडीतील जुन्या व मोडकळीस आलेल्या म्हाडा तसेच खासगी सोसायट्यांच्या पुनर्विकासासाठी सर्व प्रशासकीय पातळीवर पूर्ण सहकार्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. गुलमोहर सोसायटीसमोर अत्याधुनिक मॅट ग्राउंडसाठी आमदार निधीतून मंजुरी मिळाल्याची माहिती देत, संपूर्ण मोरवाडी परिसरात टप्प्याटप्प्याने भूमिगत वीज केबल टाकून परिसर अधिक सुरक्षित केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. कापसे उद्यानाचे सुसज्ज नूतनीकरण करून ते विकसित व सुरक्षित पार्क म्हणून उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. मोरवाडीतील गंभीर वाहतूक समस्येचा प्रश्न प्रथमच विधिमंडळात मांडून त्यावर सातत्याने पाठपुरावा करणारे नेतृत्व म्हणून आपण या सर्व प्रश्नांचा निश्चित निपटारा करू, असा विश्वास आमदार अमित गोरखे यांनी नागरिकांना दिला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“मोरवाडी, शाहूनगर, संभाजीनगर, आकुर्डी आणि काळभोरनगरमधील प्रत्येक नागरिकाचा पाणी, वीज, निवारा, सुरक्षितता व वाहतूक यांसारख्या मूलभूत सुविधांवर हक्क आहे. हे सर्व प्रश्न वेळेत आणि कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करणार असून, या परिसराचा सर्वांगीण व शाश्वत विकास घडवून आणण्याचा माझा ठाम निर्धार आहे.”
– अमित गोरखे, आमदार, भाजपा.




