अलर्ट! हल्ल्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीने १० मोबाइल क्रमांक पाठवले होते, त्यापैकी चार मोबाइल क्रमांकांनी गुप्तचर यंत्रणांची झोप उडवली
![Alert! The man who threatened the attack had sent 10 mobile numbers, out of which four mobile numbers fooled the intelligence agencies](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Alert-The-man-who-threatened-the-attack-had-sent-10-mobile-numbers-out-of-which-four-mobile-numbers-fooled-the-intelligence-agencies.png)
मुंबई : मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल व्हॉट्सअॅप क्रमांकावर २६/११ सारख्या हल्ल्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीने १० मोबाइल क्रमांक पाठवले होते, त्यापैकी चार मोबाइल क्रमांकांनी गुप्तचर यंत्रणांची झोप उडवली आहे. गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंतेचे कारण म्हणजे हे चार क्रमांक फेब्रुवारीपासून बंद आहेत.
याप्रकरणी क्राइम ब्रँचने विशेष टीम तयार करून तपास करत असल्याची माहिती आहे. क्राइम ब्रँचच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी ९ नंबर उत्तर प्रदेशातील आहेत, त्यापैकी ८ नंबर बिजनौरचे आहेत आणि एक नंबर मुझफ्फरनगरचा आहे आणि दहावा नंबर हा हरियाणामधील आहे.
मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी संहिता (एटीएस) च्या मदतीने बिजनौर यूपीमध्ये ५ पैकी ४ नंबर आणि वसईमध्ये एक नंबर शोधला आहे. वसईत ज्या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली तो हेअर कटिंग करतो. त्याची चार दिवस चौकशी करण्यात आली. बाकीची उत्तर प्रदेशात चौकशी करण्यात आली आणि आता क्राईम ब्रँचचे एक पथक हरियाणाला गेले असून यामध्ये काय माहिती समोर येते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
एजन्सींची झोप उडवणाऱ्या चार मोबाइल क्रमांकांपैकी फेब्रुवारीमध्ये एक, जुलैमध्ये दोन आणि ऑगस्टमध्ये एक फोन बंद झाला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही त्या मोबाईल नंबरचा सीडीआर काढला आहे जेणेकरून त्या मोबाईल नंबरच्या वापरकर्त्यांना शोधून त्यांची चौकशी करता येईल. त्या व्हॉट्सअॅप नंबरचा आयपी अॅड्रेस अद्यापपर्यंत काढण्यात क्राइम ब्रँचला यश आलेले नाही, फक्त तो आयपी अॅड्रेस यूकेच्या इंटरनेट प्रोव्हायडर कंपनीचा असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
व्हॉट्सअॅपवर मेसेजकर्त्याने VPN (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) वापरला असावा जेणेकरून त्याचे लोकेशन ट्रेस होऊ शकत नाही. तपास अद्याप प्राथमिक स्थितीत असल्याने या प्रकरणातील दहशतवादी अँगलही नाकारता येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.