अफजल खान वधासोबतच कृष्णा भास्कर कुलकर्णी वधाचे शिल्प उभारावे- संभाजी ब्रिगेड
दुहेरी ऐवजी तिहेरी शिल्प उभारण्याची मागणी
![Afzal, Khan, Vadha, Krishna, Bhaskar, Kulkarni, Shilpi, Sambhaji, Brigade, Double, Triple,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/afjalkhan-780x470.jpg)
पुणेः शिवछत्रपतींचा सत्य इतिहास जगासमोर जावा आणि प्रतापगडावरील शिवप्रताप घराघरात पोहोचवा अशी समस्त महाराष्ट्रातील शिवप्रेमींची इच्छा आहे तरी सर्व शिवप्रेमींच्या मागणीचा मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून कृष्णा भास्कर कुलकर्णी वधाचे शिल्प हे अफजल खान वधाच्या शिल्पासोबतच उभारावे जेणेकरून शिवप्रेमींना खरा इतिहास नेहमीच प्रेरणा देत राहील अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, सातारा जिल्हा अधिकारी तसेच पुणे जिल्हाधिकारी यांना ईमेल आणि स्पिड पोस्टद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते जिल्हा कार्याध्यक्ष वैभव जाधव यांच्या सह्या आहेत.
नुकतेच महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी किल्ले प्रतापगड तालुका वाई जिल्हा सातारा येथे उभारण्यात येत असलेल्या शिवप्रताप स्मारकाबद्दलची माहिती प्रसार माध्यमांमधून दिली आहे. या माहितीमध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले आहे की प्रतापगडाच्या पायथ्याशी दहा कोटी रुपये खर्च करून शिवप्रताप स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाला घडविण्यासाठी शिल्पकार दीपक थोपटे यांच्यासह पंधरा जणांची टीम मागील नऊ महिन्यांपासून कार्यरत आहे.
या शिवप्रताप स्मारकामध्ये स्वराज्यावर चाल करून आलेला विजापूरच्या आदिलशाहीचा सरदार अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांची हत्या करून रयतेचे स्वराज्य नष्ट करण्याचा विडा उचललेल्या स्वराज्य द्रोही अफजल खान याचा शिवछत्रपतींनी वाघ नख्यांनी पोट फाडून कोथळा बाहेर काढलेला अफजलखान वधाचा पुतळा उभारला जाणार आहे. या स्वराज्यद्रोही अफजलखान वधाच्या शिवप्रताप स्मारकाच्या संकल्पनेबद्दल पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे विशेष आभार तसेच या शिव कार्याबद्दल अभिनंदनच.
परंतु त्याच शिवप्रताप स्मारकाबरोबरच अफजल खान वधानंतर प्रतापगड येथे 10 नोव्हेंबर 1659 या शिवप्रताप दिना दिवशीच कृष्णा भास्कर कुलकर्णी हा अफजलखानाचा सल्लागार तसेच वकील आणि आदिलशाहीची इमाने ऐतबारे चाकरी करणारा नोकर हा छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्यावर आपल्या धन्याच्या वधाचा राग मनात धरून शिवरायांवर तलवार उगारुन आला आणि आपल्या तलावारीच्या साह्याने शिवछत्रपतींच्या मस्तकावर वार केला हा कृष्णा भास्कर कुलकर्णी याने केलेला वार हा शिवरायांच्या आयुष्यातील त्यांच्या शत्रू कडून शरीराला झालेला एकमेव वार होता.
त्याचवेळी शिवरायांनी सावध होत क्षणाचाही विलंब न करता अफजलखानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी या स्वराज्यद्रोह्याला आपल्या तलवारीच्या एका फटक्यात उभा चिरला हा सत्य इतिहास लपून राहिलेला नाही तो आज पण अनेक इतिहासकारांच्या तोंडून आणि लेखी पुराव्याशी उपलब्ध आहे.
त्यामुळे प्रतापगडावर शिवप्रताप दाखवताना अफजलखान वधाबरोबरच स्वराज्यद्रोही कृष्णा भास्कर कुलकर्णी वधाचे शिल्प सुद्धा प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारण्यात यावे अशी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी करत आहोत.
10 नोव्हेंबर 1659 चा शिवप्रताप स्मारकामध्ये उभारायचं असेल तर कृष्णा भास्कर कुलकर्णी वधाच्या पुतळ्याशिवाय अफजल खान वधाचा तो प्रसंग अधुरा राहील असे समस्त महाराष्ट्रातील शिवप्रेमीचे मत आहे.