पुण्यात स्कूल बसच्या चाकाखाली सापडून १२ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू
![A 12-year-old schoolboy died after being found under the wheel of a school bus in Pune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/स्कूल-बसच्या-चाकाखाली-सापडून-१२-वर्षीय-शाळकरी-मुलाचा-मृत्यू-पुण्यातील.jpg)
पुणे :विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसच्या चाकाखाली सापडून बारा वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द भागात घडली. अर्णव अमोल निकम (वय १२, रा. राजयोग टाऊनशिप, वडगाव खुर्द) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
ब्लॅासम पब्लिक स्कूलची बस विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी मंगळवारी दुपारी राजयोग सोसायटी परिसरात आली होती. बसमधून अर्णव तसेच अन्य विद्यार्थी उतरले. बस वळत असताना मागच्या चाकाखाली सापडून अर्णवचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अर्णवबरोबर बसमधून उतरलेले विद्यार्थी भयभीत झाले.
अपघाताची माहिती मिळताच सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, उपनिरीक्षक किशोर तनपुरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. अपघातात अर्णवचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. बस चालक दत्तात्रय लक्ष्मण परेकर (वय ४९, रा. धनकवडी) आणि वाहक रिया जाधव (वय ३३, रा. नऱ्हे ) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.