मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघातात ३ ठार, आई व मुलाचा जागीच मृत्यू
![3 killed, mother and child killed on Mumbai-Goa highway](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/मुंबईतील-तरुणाचा-आईसोबत-धक्कादायक-शेवट-मुंबई-गोवा-महामार्गावर-भीषण-अपघातात-३.jpg)
मुंबई : महाराष्ट्रात अपघातांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आताही असाच भीषण अपघात रत्नागिरीतल्या लांजा तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर झाला आहे. रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला तर एका ट्रक चालकाचाही मृत्यू झाला आहे. तर काहीजण गंभीर असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंजनारी पुलावर हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. गोव्याच्या दिशेने निघालेल्या मातीने भरलेल्या ट्रकचं नियंत्रण सुटलं आणि मारुती सुझुकी या कारवर आदळला. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये आई आणि मुलाचा मृत्यू झाला. दोन्ही वाहनं सुमारे ३० फूट काजली नदीत पडली आणि ट्रक कारच्या वरच्या बाजूला पडला. यामध्ये ट्रक चालकानेही जीव गमावला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक विजेश सावंत (३५) याचा जागीच मृत्यू झाला तर ट्रक क्लीनर जयराम तांबे (२४) किरकोळ जखमी झाला आहे. तर कारमधील मृतांमध्ये समीर शिंदे (३५) आणि त्यांची आई सुहासिनी शिंदे (६०) यांचा समावेश आहे. समीर आणि त्याचे कुटुंब अंधेरी पूर्व येथील रहिवासी आहे. हे कुटुंबीय मालवणहून चिपळूण इथल्या त्यांच्या मूळ गावी परतत होतं. यामध्ये तरुणाची पत्नी आणि वडील गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे तर जखमींना रत्नागिरीतील खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.
पुलाच्या पुढे वळण घेत असलेल्या उतारावर ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. पोलीस या घटनेमध्ये पुढील तपास करत असून जखमींवर उपचार सुरू आहे.