१६ डब्यांची बुलेट ट्रेन, बीकेसीत भुयारी टर्मिनस; कसं सुरु आहे बुलेट ट्रेनचं काम?
![16 coach bullet train, subway terminus at BKC; How is the work of the bullet train?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/16-coach-bullet-train-subway-terminus-at-BKC-How-is-the-work-of-the-bullet-train.jpg)
मुंबई: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला राज्य सरकारच्या आवश्यक सर्व मंजुरी तातडीने देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. राज्य सरकारच्या शब्दानंतर राज्यातील बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम रुळांवर आणण्यासाठी नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने (एनएचआरसीएल) वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) भुयारी बुलेट टर्मिनससाठी निविदा मागवल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना नोव्हेंबर २०१९मध्ये ‘एनएचआरसीएल’ने निविदा मागवल्या होत्या. मात्र, बीकेसीतील प्रस्तावित जागेत करोना केंद्र असल्याने संबंधित जागा ‘एनएचआरसीएल’ला मिळू शकली नव्हती. यामुळे निविदा रद्द करण्यात आल्या होत्या.
जागेचा ताबा सप्टेंबरअखेर
– सत्तांतर झाल्यानंतर रखडलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती देण्यासाठी सरकारच्या आदेशानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने महापालिकेला करोना केंद्राची जागा रिकामी करण्याच्या सूचना
– सप्टेंबरअखेर बीकेसीतील जागा ‘एनएचआरसीएल’च्या ताब्यात मिळण्याची शक्यता
वर्षाखेरीस कंत्राटदाराची नियुक्ती
– मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन टर्मिनसवरील एकमेव आणि देशातील पहिल्या भुयारी बुलेट ट्रेन टर्मिनसचा आराखडा आणि बांधणीसाठी २२ जुलैला निविदा मागवल्या
– या निविदा २१ ऑक्टोबरला उघडण्यात येणार
– निविदांची छाननी केल्यानंतर साधारण वर्षाखेरीस कंत्राटदार निश्चित करण्यात येईल; ‘एनएचआरसीएल’ची माहिती
४१५ मीटर लांबीचे फलाट
– १६ डब्यांची बुलेट ट्रेन चालवण्याचे नियोजन
– त्यासाठी बुलेट ट्रेनच्या फलाटांची लांबी ४१५ मीटर असणार
– या टर्मिनसला मेट्रो आणि रस्ते मार्गांची थेट जोडणी असेल
– जमिनीपासून २४ मीटर आत फलाट असणार
– या ठिकाणी एकूण तीन मजले उभारणे प्रस्तावित
– या मजल्यावर प्रवासी मनोरंजन आणि अन्य सुविधा उभारण्यात येणार
नैसर्गिक प्रकाशाचा वापर
– प्रवासी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, प्रवासी उद्घोषणा यंत्रणा, प्रतीक्षालय, तिकीट खिडक्या, नर्सरी आणि अन्य सुविधा उभारणार
– टर्मिनस प्रवेशासाठी सध्याच्या एमटीएनएल इमारतीच्या दिशेने प्रवेशगेट प्रस्तावित
– नैसर्गिक प्रकाश थेट फलाटावर येईल, असा आराखडा तयार करणार; ‘एनएचआरसीएल’ची माहिती