स्मार्ट सिटीतून शहरात सायकल शेअरींग प्रकल्प राबविणार
मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त श्रावण हर्डिकर यांची माहिती
स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत निर्णय
पिंपरी ( महा ई न्यूज ) – स्मार्ट सिटी प्रकल्पार्तंगत पिंपरी चिंचवड शहरात सायकल शेअरींग प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील झोपडपट्ट्यासह अविकसित भागात हा प्रकल्प टप्प्याने सुरु करणार अाहे, अशी माहिती स्मार्ट सिटी कंपनीचे सीईआे तथा आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महापालिकेच्या मुख्य इमारतीत आज (शनिवारी) पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रायवेट लिमिटेड या कंपनीच्या अध्यक्ष व संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबत विविध धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. यावेळी कंपनीचे अध्यक्ष नितीन करीर, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी सभापती ममता गायकवाड, विरोधी पक्षनेते दत्ता साने, संचालक प्रमोद कुटे, सचिन चिखले यांच्यासह आदी अधिकारी उपस्थित होते.
आयुक्त हर्डिकर म्हणाले की, पिंपळे गुरव आणि पिंपळे साैदागर याठिकाणी प्रायोगिक तत्वावर सार्वजनिक सायकल शेअरींगचा प्रकल्प राबविला आहे. त्यानुसार संपुर्ण पिंपरी चिंचवड शहरातही हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. सुरुवातील येत्या दोन महिन्यात शहराचे सर्वेक्षण करण्यात येईल. शहरातील झोपडपट्टी परिसर, अविकसित परिसरात सार्वजनिक सायकल शेअरींग शुल्क हे कमी करण्यात चर्चा करण्यात येईल.
पिंपळे गुरव व पिंपळे साैदागरला एका सायकलसाठी ताशी 10 रुपये प्रमाणे सायकल भाड्याने देण्यात येणार आहे. मात्र, सर्वच भागात हा दर न ठेवला जाणार नाही. तेथील नागरिकांच्या गरजेनूसार तो दर कमी केला जाणार आहे. तसेच शहरातील अनेक भागात सायकल ट्रॅक बनविले जाणार आहेत. परंतू, निगडी ते दापोडी मार्गावर मेट्रोचे काम पुर्ण झाल्यानंतर फुटपाथ काढून त्याठिकाणी दोन्ही एकत्रित काम करणार आहे. त्यानूसार सायकल ट्रॅकचे काम टप्प्या टप्प्याने सुरु करणार आहोत. दोन महिन्यात सव्हेक्षण करुन कामाला सुरुवात करण्यात येईल. असेही ते म्हणाले.