शहरातील पाणी कपात उठवून नागरिकांना नियमित पाणी द्या – संदीप काटे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/pcmc.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणा-या मावळातील पवना धरणात मुबलक पाणीसाठी उपलब्ध झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरवासियांवर लादलेली पाणी कपात रद्द करून दररोज नियमित पाणी पुरवठा सुरू करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवानेते संदीप काटे यांनी केली आहे.
उन्हाळ्यात पवना धरणातील उपलब्ध पाण्याचा विनियोग होणार नाही, याची काळजी घेऊन पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे धरणातील उपलब्ध पाणीसाठा आजअखेरपर्यंत पुरवठा करता आला. यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय हिताचा ठरला. तरी, गेल्या चार दिवसांपासून धरण पानलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस सुरू आहे. त्यामुळे पवना धरणात आजअखेरीस 62.65 टक्के (6.43 टीएमसी) पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या 24 तासात पाणी साठ्यामध्ये 8.14 टक्क्याची भर पडली आहे. अपेक्षीत पाणीसाठा उपलब्ध आहे. आणखी काही दिवस असाच पाऊस कायम राहिल्यास धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे.
पवना धरणात पुरेसा साठा झाल्यानंतर उर्वरीत पाण्याचा नदीमध्ये विसर्ग करावा लागतो. तरी, सध्याचा पाणीसाठा पाहता आयुक्त हर्डीकर यांनी शहराला लागू केलेली दिवसाआड पाणी कपात मागे घ्यावी. पुढील काळातील हवामान खात्याच्या अंदाजानुसार पर्जन्यवृष्टीचे अनुमान विचारात घेऊन पिंपरी-चिंचवडकरांना दररोज नियमित पाणी पुरवठा सुरू करावा, अशी मागणी युवानेते संदीप काटे यांनी केली आहे.