विधान परिषदेची आमदारकी मिळाली नाही तर… उर्मिला मातोंडकर काय म्हणाल्या
मुंबई : काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काही दिवसांपुर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. एका मुलाखतीमध्ये याविषयी बोलताना मातोंडकर यांनी विधान परिषदेची आमदारकी मिळाली नाही तरी शिवसेनेसाठी काम करत राहणार असल्याचे म्हटले आहे. कोणत्याही पदासाठी मी शिवसेनेत प्रवेश केलेला नाही, असे मातोंडकर यांनी म्हटले आहे.
काँग्रेसमध्ये होते तेव्हाही लोकसभा उमेदवारीची अपेक्षा केली नव्हती. काँग्रेससाठी प्रचार करूनही मी समाधानी राहिले असते. ज्याप्रमाणे बॉलीवूडमध्ये लोकांनी मला स्टार बनवले त्याचप्रमाणे राजकारणात लोकांसाठी नेता बनायचे आहे. एसी रूममध्ये बसून टि्वट करणारी नेता बनायची माझी इच्छा नाही, असे म्हणत त्यांनी आपल्या भविष्यातील राजकारणाचे संकेत दिले आहेत.
लोकसभेत पराभव झाला म्हणून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचा आरोप देखील मातोंडकर यांनी फेटाळला. माझ्यासाठी माझ्या अंतरात्म्याचा आवाज महत्त्वाचा असल्याचे यावेळी उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.