मुख्य अग्नीशमन केंद्रातील स्वच्छतागृहाला ‘ई-एक्सेस’ सोय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/IMG-20190227-WA0013.jpg)
- ई-एक्सेसमुळे स्वच्छता आणि पाण्याचा अपव्यय टळला
- महापालिकेत पहिल्यांदाच अनोखा प्रयोग
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य अग्नीशमन केंद्रात स्वच्छ भारत अभियानतंर्गत स्वच्छतागृहाला ‘ई-एक्सेस’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. यामुळे स्वच्छतागृह कायम स्वच्छ राहत असून पाण्याचा अपव्यय कमी झाला आहे, अशी माहिती मुख्य अग्नीशमन अधिकारी किरण गावडे यांनी दिली. यावेळी उपअग्नीशमन अधिकारी अशोक काकडे उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियानतंर्गत मुख्य अग्नीशमन कार्यालयातील स्वच्छतागृहाचा सार्वजनिक वापर मोठ्या प्रमाणात होवू लागला. त्यामुळे स्वच्छतागृहात दररोज 500 लिटरहून अधिक पाण्याचा वापर होवू लागला. स्वच्छतागृहात बाहेरील नागरिकांचा वावर वाढल्याने अस्वच्छतेचे प्रमाण वाढून दुर्गंधी येवू लागली. यामुळे कार्यालयातील कर्मचा-यांना स्वच्छतागृह साफसफाईंचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच स्वच्छतागृहाची मोडतोड देखील होवू लागली.
दरम्यान, मुख्य अग्नीशमन कार्यालय परिसरातील स्वच्छतागृहाला इलेक्ट्राॅनिक पध्दतीने ई-एक्सेस मशिनची सुविधा बसविण्यात आली. त्या ई-एक्सेस मशिनसाठी कार्ड तयार केलेले आहे. त्या कार्डचा वापर करुन स्वच्छतागृहाचा बाहेरील दरवाजा यापुढे उघडण्यात येणार आहे. महापालिकेच्या कार्यालयामध्ये पहिल्यांदाच मुख्य अग्नीशमन अधिका-यांनी स्वच्छतागृहाचा ई-एक्सेस प्रयोग राबविल्यामुळे स्वच्छतागृहाची देखभाली दुरुस्ती कमी प्रमाणात राहू लागली. पाण्याचा अपव्यय कमी होवून स्वच्छतागृहाची साफसफाई योग्य प्रकारे राहू लागली आहे. कार्यालयात विविध कामानिमित्त येणा-या देखील स्वच्छतागृहात जाण्यासाठी ई-एक्सेसच्या कार्डचा वापर करावा लागणार आहे.
दरम्यान, स्वच्छतागृहातील ई-एक्सेस मशीनचा खर्च अत्यल्प असून तो मुख्य अग्नीशमन अधिका-यांनी केला आहे. या सुविधेमुळे नागरिकांसह कर्मचा-यांना स्वच्छतागृहाबाबत शिस्त लागून त्याची निगा व्यवस्थित राहण्यास मदत झाली आहे. शिवाय कार्यालय परिसरातील सुरक्षेचा प्रश्न देखील उदभवणार नसल्याचे मुख्य अग्नीशमन अधिकारी किरण गावडे यांनी सांगितले.
पशु-पक्ष्यांना चारा-पाणी अन्ं कंपोस्ट खत निर्मिती
संत तुकारामनगर येथील महानगरपालिकेच्या मुख्य अग्नीशमन कार्यालयात परिसरात वृक्षांची संख्या अधिक आहे. सध्या उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली आहे. त्यामुळे झाडांवरील येणा-या पशु-पक्ष्यांना चारा आणि पाण्याची कमतरता जाणून नये, याकरिता पाणी भरलेले प्लास्टिकचे डब्बे झाडांच्या फाद्यांना लावले आहेत. शिवाय झाडांचा पडलेला पाला-पाचोळा कच-याच्या घंटागाडीत न देता कार्यालय परिसरात टाकाऊ पासून टिकाऊ बनविलेल्या प्लास्टिकच्या बॅरेलमध्ये कंपोस्ट खत बनविण्यात येत आहे. त्यामुळे घंटागाडी कर्मचा-यांना कचरा घेवून जाण्याची आवश्यकता लागत नसल्याचे अशोक काकडे यांनी सांगितले.