बॉलिवूड आर्टिस्ट सुरज गोदांबेला अटक; कोट्यवधींचे ड्रग्स जप्त
ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूडमधील आणखी एक कलाकार एनसीबीच्या ताब्यात घेतलं आहे. सध्या बॉलिवूड ड्रग्ज माफियांवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची करडी नजर आहे. सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दिया मिर्झा, अबिगल पांडे, भारती सिंह यांसारख्या अनेक नामांकित बॉलिवूड कलाकारांची नाव ड्रग्ज प्रकरणी समोर आली. आता प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट सुरज गोदांबे याला एनसीबीनं ड्रग्ज प्रकरणी ताब्यात घेतलं आहे.
एनसीबीनं गुरुवारी सकाळी त्याच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी त्याच्या घरात जवळपास दोन कोटी ५० लाख रुपयांचे ड्रग्स सापडले. शिवाय १३ लाख ५१ हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. या पैशांचा हिशोब त्याला देता आला नाही. परिणामी एनसीबीने त्याला चौकशीसाठी अटक केली आहे. या चौकशीत बॉलिवूडमधील आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अवश्य वाचाः #VIRALVIDEO: जिंदगी ना मिलेगी दुबारा; वयस्कर आजीआजोबांचा डान्स व्हिडिओ व्हायरल
यापूर्वी एनसीबीने कॉमेडियन भारती सिंहच्या घरावर छापा टाकला होता. चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचियाने अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यानंतर या दोघांना न्यायालयाने १४ दिवसांची म्हणजे ४ डिसेंबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली. ज्यानंतर भारती आणि तिच्या पतीने जामिनासाठी अर्ज केला होता. दोघांनाचाही जामीन मंजूर झाला आहे.