फक्त घरात बसून काही होत नाही…, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
फक्त घरात बसून काहीच होत नाही. क्षमा करण्यासाठी मोठं मन हवं असतं, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. एका कार्यक्रमात त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आले. गेल्या तीन महिन्यांपासून या दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. तसंच, शिवसेनेतील अनेक नेते, पदाधिकारी शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे या वादाला आणखी तोंड फुटलं आहे. दरम्यान, दसरा मेळाव्यावरूनही राज्यात घमासान सुरू आहे. त्यामुळे शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा रणसंग्राम रंगणार आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
फक्त घरात बसून काहीच होत नाही. क्षमा करण्यासाठी मोठं मन हवं असतं. मैत्रीसोबत क्षमा जोडली तर सगळे वाद मिटतात, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
शिंदे गटाला परवानगी, ठाकरेंचा अर्ज फेटाळला
वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान मिळवण्यासाठी बंडखोर शिंदे गटाच्या आमदारांचे प्रयत्न सुरु आहे, यात शिंदे गटाच्या आमदारांनी केलेला अर्ज ‘एमएमआरडीए’ने स्वीकारला असून शिवसेनेने ज्या मैदानास अर्ज केला ते आरक्षित असल्याने फेटाळण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेत आहे. मात्र शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरीमुळे दसरा मेळाव्यालाही फटका बसण्याची चिन्ह आहेत. दरम्यान शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेहस शिंदे गटातील आमदारांनी देखील अर्ज केला. परंतु शिवाजी पार्क मैदान कोणाला मिळणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता महापालिकेने दोन्ही गटाला परवानगी नाकारली आहे. मात्र वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानात मेळावा घेण्याचा शिंदे गटाच्या निर्णयानंतर आता शिवसेनेची मात्र कोंडी होणार आहे.