breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरी चिंचवडमध्ये ‘राष्ट्रवादी’चे दालन ठरतेय ‘भाजप बंडखोरा’चे ‘आश्रयस्थान’

– स्वपक्षीय नगरसेवकांचा विद्रोह भाजपची वाढती डोकेदुखी 
– प्रशासनावर वचक नसल्याने भाजप नगरसेवकांची सत्तारुढ पक्षनेत्यांवर नाराजी  

विकास शिंदे 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – श्रीमंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काॅंग्रेसची अविरत असलेली पंधरा वर्षाची सत्ता भाजपने स्थानिक भूमीपूत्राच्या माध्यमातून उलथवून टाकली. त्यानंतर महानगरपालिकेचे कारभारी म्हणून चिंचवडचे ‘राम’ आणि भोसरीचे ‘लक्ष्मण’ अर्थात स्थानिक आमदारांच्या हाती सत्तेचा चाव्या जावून त्यांच्याकडून रिमोट कंट्रोलवरुन महानगरपालिकेची सुत्रे हलविली जात आहेत. मात्र, महापालिकेवर भाजपची सत्ता येवून दोनच वर्षे लोटली नाहीत, तोपर्यंत भाजपमधील नगरसेवकांची खदखद प्रचंड वाढली असून कित्येक नगरसेवकांची बंडखोरी पक्षाच्या मुळावर उठली आहे. महापालिकेच्या महासभेतील विषयासह अन्य प्रस्तावांना भाजप नगरसेवक उघड नाराजी व्यक्त करुन थेट पक्षासह दोन्ही आमदारांवर हल्ला करु लागले आहेत. तसेच प्रशासन चालविण्यास सत्तारुढ पक्षनेते असमर्थ असल्याचे सांगून त्यांच्यावर देखील निष्क्रीयतेचा ठपका ठेवला जात आहे. विशेष म्हणजे भाजप नगरसेवकांची बंडखोरी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पथ्यावर पडत असून महानगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेत्यांचे कार्यालय त्यांचे आश्रयस्थान बनू लागले आहे. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर सलग पंधरा वर्षे सत्ता उपभोगून शहराचे हुकमीएक्का असलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुर्वाश्रमीचे कारभारी म्हणून वावरत होते. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या काळात श्रीमंत महानगरपालिकेवरील सलग 15 वर्षाच्या सत्तेमुळे राष्ट्रवादीला सत्तेची धुंदी चढली होती. राष्ट्रवादीने स्थानिक भूमिपुत्राना डावलून बाहेरुन स्थायिक झालेल्यांच्या हाती महानगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या दिल्याने पक्षार्तंगत असंतोष प्रचंड वाढला होता. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या फेब्रुवारी 2017 मधील सार्वत्रिक निवडणुकीत ‘आता नको बारामती, नको भानामती, शहराची सत्ता ‘राम-लक्ष्मण’च्या हाती, अशी प्रकारे प्रचारात रंगत आणून राष्ट्रवादी काॅंग्रेसची सत्ता उलथवून भाजप सत्ता प्रस्थापित झाली.

पिंपरी चिंचवड शहरवासियांनी भाजपवर विश्वास टाकून  महानगरपालिकेवर सत्ता दिली. भाजपची सत्ता आल्यानंतर दोन वर्षात सुरळीत कारभार चाललेला नाही,  महापालिकेतील महापाैर, स्थायी सभापती पदावरुन भाजपमध्ये रुसवे-फुगवे प्रचंड वाढले. पहिल्याच वर्षात स्थायी समितीतील अनेक विषय वादग्रस्त ठरले. कित्येक कामांच्या जादा दराच्या निविदा,  तसेच पदाधिकारी-अधिकारी आणि ठेकेदारांनी निविदेत केलेल्या रिंग, पाणी व कचरा प्रश्न सोडविण्यात आलेले अपयश, अनधिकृत बांधकामासह सरसकट शास्तीचा प्रश्न, रेडझोन, बफर झोन यासह अनेक कामांच्या सल्लागारांवर होणारी उधळपट्टी, रस्ते, आरोग्य, पथदिवे कामांची बोंबाबोंब आहे. विशेष म्हणजे जनहिताच्या विरोधात भाजपाने घेतलेल्या निर्णयामुळे दोन वर्षांतच भाजप कोंडी करण्यात विरोधक यशस्वी ठरु लागले आहेत.

महापालिकेतील महासभेत सत्तारुढ पक्षनेत्यांनी नगरसेवकांना व्हीज बजावूनही अनेक विषयांच्या विरोधात नगरसेवक पक्षविरोधी भूमिका घेत आहेत. पक्षविरोधी भूमिका घेणा-या नगरसेवकांना शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी काही दिवसापुर्वी दिला होता. तरीही भाजप नगरसेवक उघडपणे पक्षाच्या विरोधात काम करु लागले आहे. नुकताच नगरसेविका माया बारणे यांनी महापालिकेवर मोर्चा काढून सत्तारुढ पक्षनेत्यांवर आगपाखड करत निष्क्रीयेचा ठपला ठेवला. तसेच भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रवि लांडगे यांनी भोसरी रुग्णालय खासगीकऱण विरोधात जनआक्रोश मोर्चा काढून राष्ट्रवादी काॅंग्रेस कार्यालयातून भाजप विरोधात आवाज उठविला. कित्येक नगरसेवकांनी भाजप विरोधात पत्रकबाजी सुरुच ठेवली आहे. भाजपमधील दोन्ही आमदारांच्या समर्थक  नगरसेवकांच्या गट-तटात भाजप निष्ठावंत सत्तारुढ पक्षनेत्यांची चांगलीच पंचाईत झाली असून नगरसेवकांची नाराजी दूर करण्यास त्यांनाही अपयश येत आहे.

दरम्यान, महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत ऐनवेळी शितल ऊर्फ विजय शिंदे यांना डावलून विलास मडिगेरी यांना संधी दिली. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेनेच्या मदतीने शितल शिंदे यांनी भाजप विरोधी बंडखोरी करत अर्ज दाखल केला. तसेच राष्ट्रवादी विरोधी पक्षनेत्याच्या दालनात त्यांनी सर्वपक्षीय पत्रकार परिषदेतून नाराजी व्यक्त केली. त्यामुळे भाजप नगरसेवकांमध्ये वाढलेली खदखद राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडू लागली आहे. तसेच राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी भाजप विरोधात जे-जे बोलतील, ते सर्व आपले हे धोरण वापरले आहे. त्यांनीही जनहिताच्या विरोधातील विषयांना सत्ताधा-यांना विरोध दर्शविला आहे. त्यांनी सर्वपक्षीय अनेक नगरसेवकांना एकत्रित आणून भाजप विरोधात चांगलेच रान तापविले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसह भाजपमधील कित्येक नगरसेवकांचे विरोधी पक्षनेत्यांचे दालन हे बंडखोराचे आश्रयस्थान बनू लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button