पवनाथडीत विरोधकांचा मटणावर ताव, जगतापांच्या विरोधात आखला राजकीय डाव
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शहरातील महिला बचत गटांच्या सदस्यांनी बनविलेल्या वस्तुंची बाजारपेठ हा पवनाथडीचा उद्देश कालबाह्य होत चालला आहे. घरगुती बनावटीच्या वस्तुंची दुकाने कमी प्रमाणात दिसत आहेत. परंतु, घाऊक बाजारातील वस्तूंची दुकाने सर्रास थाटली जात आहेत. याची पाहणी करण्यासाठी महापालिकेतील विरोधकांनी पवनाथडीला भेट देऊन तेथील चविष्ट मटणावर आज ताव मारला. आणि पवनाथडी फायद्यात नसेल तर आयोजनावर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचवून पुढील वर्षापासून ही जत्रा बंद करण्याची व्युवरचना आखला आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात विरोधकांनी आखलेला हा राजकीय डाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
शहराचे कारभारी असलेले भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतदार संघातील सांगवीच्या पीडब्ल्युडी मैदानावर यंदाची पवनाथडी जत्रा भरविली आहे. ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून खुद्द जगतापांनी जत्रेतील व्यवसायिक महिलांच्या स्टॉलला भेट देऊन त्यांच्या फायद्या-तोट्याची विचारपूस केली आहे. जत्रेचा आज शेवटचा दिवस असल्याने पालिकेतील विरोधकांनी देखील पवनाथडीला आज मंगळवारी (दि. 8) आवरजून भेट दिली. विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, नगरसेवक निलेश बारणे, राष्ट्रवादीचे नेते नाना काटे, प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे, शाम लांडे, युवकचे माजी अध्यक्ष मयूर कलाटे, स्थायीचे माजी सभापती नवनाथ जगताप यांनी पवनाथडीतील व्यवसायीक महिलांकडून आर्थिक फायद्याची माहिती घेतली. यावेळी नेत्यांनी पवनाथडीतील चविष्ट मटणावर ताव मारला. माटणाचा आस्वाद घेत त्यांनी पुढील वर्षी पवनाथडी सुरू ठेवण्यासंदर्भात चर्चेचा खल केला.
विशेष बाब म्हणजे बचत गटांच्या महिला सदस्यांना चार पैसे मिळवून देणारी पवनाथडी मूळ उद्देशापासून कालबाह्य होत चालली आहे. त्यात बदल सूचवून जत्रेला नवचैतन्य मिळवून देण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे. उलट ही जत्रा बंद करण्यासंदर्भातच अधिक चर्चेचा खल होताना दिसत आहे. फायदा-तोटा महत्वाचा की बचत गटांच्या महिलांचे स्वयंरोजगाराचे हीत महत्वाचे याचाही विचार विरोधक आणि सत्ताधारी यांना करावा लागणार आहे.
शिवसेना नेत्याचा पुढाकार
शिवसेना गटनेते राहूल कलाटे हे चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर प्रतिस्पर्धक आहेत. त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत चिंचवड विधानसभेवर भगवा फडकवण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे अलिकडे कलाटे हे आमदार जगतापांच्या विरोधात थेटपणे जाताना दिसत आहेत. पवनाथडीचा योग साधून जगतापांना धक्का देण्यासाठी जत्रेचा पाहणी दौरा त्यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केल्याचे बोलले जाते. या दौ-याला पुष्टी मिळण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जगतापांचे दुसरे प्रतिस्पर्धक विठ्ठल उर्फ नाना काटे आणि मोरेश्वर भोंडवे यांचा देखील सहभाग बोलका ठरत आहे. तर, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे आणि स्थायीचे माजी सभापती नवनाथ जगताप यांच्यात झालेल्या गट्टीने राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण केला आहे.