Uncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
चाकणच्या महिंन्द्रा कंपनीतील कामगारांचे प्रश्न अजूनही प्रलंबित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/phpThumb_generated_thumbnail-1-1.jpeg)
पिंपरी – चाकण येथील महिंन्द्रा कंपनीत काम करणा-या तब्बल दोन हजार 400 कामगारांचा वेतन करार रखडलेला आहे. कंपनीने 2013 मध्ये कामगारांशी केलेला वेतन करार संपून तब्बल बारा महिने उलटून गेले आहेत. तब्बल पाच वर्षांनी देखील तितक्याच वेतनावर कामगारांना जगणे मुश्कील झाले आहे. वाढत्या महागाईची चपराक समाजातील सर्वच वर्गातील लोकांसोबत कामगार वर्गालाही बसू लागली आहे.
याबाबत सदरील वेतन करार हा कामगार आयुक्तालयात कार्यवाहीसाठी दाखल आहे. वेतन वाढीचा प्रश्न सुटला नसल्याने कामगारांना वेतन करारासाठी न्यायालयाकडे धाव घ्यावी लागली आहे. कंपनी व्यवस्थापन चुकीच्या प्रथा निर्माण करुन आडमुठे धोरण राबवित आहे. याविषयी कामगारांमध्ये व्यवस्थापनाबाबत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. कंपनी व्यवस्थापन हे कामगारांचे नुकसान करीत असल्याचा आरोप महिंद्रा कामगार संघटनेचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी केला आहे.
पाटील म्हणाले की, कंपनीतील कामगार हा महाराष्ट्रातील कानाकोपर्यातून नोकरीसाठी शहरात वास्तव्यास आला आहे. तब्बल दहा वर्षे नोकरीची पूर्ण होत असताना देखील कित्येक कामगारांना स्वतःचे घरदेखील खरेदी करता येत नाही. एवढी दयनीय अवस्था कामगारांची होऊन बसली आहे. त्यातच प्रचंड वेगाने वाढणारे घरभाडे व इतर महागाईमुळे कामगारांची कुटुंब व्यवस्था ढासळत चालली आहे. भुकेले पोट आणि रिकामा खिसा असे कामगारांचे गणितच होऊन बसले आहे. गावाकडे दुष्काळामुळे शेतीचे होणारे नुकसान आणि काही पिकलेच तर अत्यल्प बाजारभाव यामुळे कामगारांचे कुटुंबीय ही अडचणीत सापडले आहेत. कामगारांना आई-वडीलांच्या आजारपणाचा खर्चही पेलवत नाही. त्यामुळे कित्येक कामगारांच्या कुटुंबात कलह निर्माण होऊन कुटुंबीयांवर जीव देण्याची वेळ येऊन बसली आहे. तरी ही संपूर्ण समाजव्यवस्था बिघडवण्यास व्यवस्थापन जबाबदार असल्याचे संघटनेने आरोप केला आहे. त्यामुळे व्यवस्थापनाने लवकरात लवकर वेतनकरार मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी कामगार संघटनेने व्यवस्थापनाकडे केली आहे. दरम्यान, कंपनी व्यवस्थापनाशी संर्पक साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होवू शकला नाही.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/NCP-Melawa-4-300x190.jpg)